ऐरोली येथे राहणाऱ्या सुनिता काटकर त्यांच्या मंथन या सहा महिन्याच्या मुला सोबत घेऊन कपडे खरेदीसा़ठी बाहेर पडलेल्या असताना मोटारसायकलवरून आलेल्या अपहरणकर्त्यांनी बाळा हिसकावून पळ काढला होता. रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रबाले एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० तासाच्या आत अपहरणकर्त्यांचा शोध लावत पोलिसांनी बाळाला त्याच्या आईकडे सुखरुप सोपवले.
याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. डोंबिवली येथील एका इस्टेट एजेंटने मुलगा नसल्याने या मुलाचे अपहरण केले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. काटकर या ऐरोली सेक्टर २ येथील संकल्प सोसयटीतील रहिवाशी आहेत. ठाणे येथे कपडे खरेदीसाठी सकाळी अकराच्या सुमारास त्या मंथनला घेऊन घराबाहेर पडल्या. याचदरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी काटकर यांच्या हातातील मंथनला हिसकावून पळ काढला.

‘महिला सुरक्षा क्र मांक ’ आता रिक्षा-टॅक्सीतही!
मुंबई ; महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष क्रमांक जाहीर केल्यानंतर तो सहजपणे दिसावा अशा रितीने रिक्षा तसेच टॅक्सी आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्याचे आदेश आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत. विशेषत: रिक्षा आणि टॅक्सीत दर्शनी भागात हा क्रमांक दिसावा, या दिशेने प्रदर्शित करण्याच्या सूचना सहआयुक्त (वाहतूक) भूषण उपाध्याय यांना मारिया यांनी दिल्या आहेत.पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत मारिया यांनी महिलांसाठी विशेष क्रमांक जाहीर करण्याचा आपला मानस असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार ९९६९७७७८८८ हा क्रमांक महिला सुरक्षेबाबतच्या तक्रारींसाठी देण्यात आला आहे. या क्रमांकावर रिक्षा वा टॅक्सीचा क्रमांक एसएमएस करावा. या मोबाईल क्रमांकावर तब्बल एक कोटी संदेश साठविण्याची व्यवस्था आहे. अनुह्य़ा इस्थर प्रकरणामुळेच हा क्रमांक जाहीर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

कळव्यात दोन मुलांचे अपहरण
ठाणे : कळवा येथील मफतलाल परिसरात राहणाऱ्या दोन लहान मुलांचे रविवारी अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या दोन्ही मुलांचा कळवा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शांती मफतलाल झोपडपट्टी परिसरातील शंकर मंदीराजवळ राहणारा एक नऊ वर्षीय मुलगा रविवारी सकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेला. मात्र, दुपापर्यंत तो घरी परतलाच नाही. अनोळखी व्यक्तीने फूस लावून त्याला पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. तसेच शांती मफतलाल झोपडपट्टी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटीजवळ राहणाऱ्या १३ वर्षिय मुलाचेही रविवारी सायंकाळी अपहरण झाले असून त्याचाही शोध लागलेला नाही. या दोन्ही घटनांप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

किरकोळ वादातून तरुणाची हत्या
नवी मुंबई : तळवली येथे किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तळवली गाव येथे हा प्रकार घडला. प्रदीप शिंदे (२१) हा तरुण आजीला गावी सोडण्यासाठी तळवली नाका येथे आला होता. तेथून तो परत घरी एकटाच जात असताना त्याची हत्या झाली होती. प्रदीप हा रस्त्याने एकटाच चालल्याचे हेमंत दळवी (२१) आणि अभिजित सावंत (२६) या दोघांनी पहिले होते. त्यांच्यात यापूर्वी मुलीवरून वाद झाला होता. त्याचाच राग काढण्यासाठी हेमंत व अभिजित या दोघांनी पाठीमागून प्रदीपच्या डोक्यात स्टंप मारला. त्यानंतर तो जखमी होवून खाली पडताच त्याच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केली. यावेळी हे दोघेही दारूच्या नशेत होते. त्यांच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला.