News Flash

संक्षिप्त : व्हॉट्सअॅपवर अफवांचे ‘स्फोट’

भायखळ्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या गाडीत छोटा स्फोट झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत..’, ‘अंधेरी स्थानकावर बॉम्ब, बॉम्बशोधक पथकाची धावपळ’,

| May 21, 2014 02:51 am

भायखळ्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या गाडीत छोटा स्फोट झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत..’, ‘अंधेरी स्थानकावर बॉम्ब, बॉम्बशोधक पथकाची धावपळ’, ‘चर्चगेट स्थानकात बॉम्ब सापडला..’ या प्रत्यक्षात कधीच न घडलेल्या घटनांनी सध्या व्हाट्सअॅपवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे या अफवांनी रेल्वे आणि पोलीस प्रशासनही हैराण झाले असून एखाद्या विषाणूपेक्षा वेगाने पसरणाऱ्या या अफवांना आळा कसा घालायचा, असा पेचप्रसंग यंत्रणांसमोर उभा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्यानेच काही समाजकंटक अशा प्रकारच्या अफवा पसरवत असल्याचा संदेशही याच व्हॉट्सअॅपवर पसरत होता. गेल्या आठवडय़ात तीन वेळा घडलेल्या अफवांच्या घटनांमुळे रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासन हैराण झाले आहे.अशा प्रकारचा संदेश आल्यानंतर नजीकच्या रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार करा, असा सल्ला रेल्वे सुरक्षा दलाचे मुंबई विभागीय प्रमुख आलोक बोहरा यांनी दिला आहे.

‘जीवघेण्या पोकळी’चा आणखी एक बळी
 मुंबई : रेल्वे फलाट आणि गाडीच्या उंचीतील जीवघेणी पोकळी प्रवाशांना अद्याप भोवत असून मंगळवारी संध्याकाळी अंधेरी स्थानकातील पोकळीत पडल्याने सुदावी मेहेर (वय ३५) या महिलेचा मृत्यू ओढवला.मुंबई-सुरत फ्लाइंग राणी ही गाडी पकडण्याच्या प्रयत्नात सुदावी अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक चारवर उभ्या होत्या. गाडी येताच त्यात चढताना त्या पडल्या. संध्याकाळी ६.२५च्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्यावरील उपचारांबाबतही रेल्वे प्रशासनाची हलगर्जी दिसून आली. अंधेरीला पडलेल्या या महिलेला पालघर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर  त्यांना नालासोपारा येथील उमराव रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू ओढवला.

कॅम्पा कोला पाडण्यासाठी फेरनिविदा
मुंबई : कॅम्पा कोला पाडण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने आता पुन्हा निविदा काढण्यात येणार असून कंत्राटाची किंमत २३ लाख रुपयांनी वाढवून दोन कोटी २० लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच पाडकाम करण्यासाठी सहा महिन्यांऐवजी एक वर्षांची मुदतही देण्यात आली.
कॅम्पा कोलाचे अनधिकृत मजले पाडण्यासाठी सहा महिन्यांची मुदत तसेच एक कोटी ९७ लाख रुपयांचे कंत्राट देण्याबाबत पालिकेने काढलेल्या निविदेसाठी १८ मे शेवटची तारीख होती. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नसल्याने पालिकेने पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय घेतला. पाडकाम करण्यासाठी सहा महिन्यांऐवजी एक वर्षांचा कालावधी देण्यात येणार आहे.  नव्या पद्धतीनुसार  कॅम्पा कोला पाडण्यासाठी सुमारे दोन कोटी ६० लाख रुपयांचा खर्च होऊ शकतो. मात्र हे काम करण्यासाठी वाढीव सहा महिने देण्यात येत आहेत.  त्याचा खर्च वजा करता हे काम दोन कोटी २० लाख रुपयांना देण्याचे निश्चित केले आहे, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले.

वसईत ‘जाणता राजा’ प्रयोगावेळी प्रेक्षागार कोसळल्याने १५ जखमी
मुंबई : वसईच्या किल्ल्यावर ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचा प्रयोग सुरू असताना मंगळवारी अचानक प्रेक्षागार कोसळून झालेल्या अपघातात सुमारे १५ प्रेक्षक जखमी झाले आहेत़  सर्व जखमींना तातडीने जवळच्या कार्डिनल ग्रेशिअस आणि गोल्डन पार्क या रुग्णालयांत हलविण्यात आले आह़े  सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितल़े वसई-विरार महापालिकेकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे दैनंदिन प्रयोग वसई किल्ल्यात आयोजित करण्यात आले आहेत़  प्रयोगासाठी किल्ल्यातील चिमाजीअप्पांच्या पुतळ्यामागे व्यासपीठ आणि त्यापुढे  प्रेक्षागार बांधण्यात आले आह़े  मंगळवारी अतिभारामुळे हे प्रेक्षागार नाटक सुरू होताना कोसळल़े  तातडीने कारवाई केल्यामुळे काही वेळातच नाटक पुन्हा सुरू करण्यात आल़े

‘सलमान खानने  मद्यपान केले नव्हते’  
मुंबई : अपघाताच्या रात्री अभिनेता सलमान खानची आपणच संतप्त जमावाच्या तावडीतून सुटका केल्याचे सांगत एकीकडे त्याची ओळख पटविणाऱ्या फ्रान्सिस फर्नाडिस या साक्षीदाराने उलटतपासणीत मात्र घटनेच्या वेळी सलमानने मद्यपान केले नसल्याचा दावा मंगळवारी केला. घटनेच्या वेळेस सलमानने मद्यपान केल्याचे जाणवत नव्हते. कारण त्याच्या तोंडून दारूचा वास येत नव्हता, असे फर्नाडिसने सांगितले.

बनावट व्हिसाप्रकरणात नायजेरियन नागरिकच
मुंबई : व्हिसा संपल्यानंतरही वास्तव्य करता यावे, यासाठी बनावट व्हिसा तयार करणाऱ्या टोळीचा छडा मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने लावला आहे. या टोळीत प्रामुख्याने नायजेरियन नागरिकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तपास करून पोलिसांनी दोघा नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट व्हिसासाठी आलेले सुमारे २२ पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे. या पासपोर्टवरून संबंधित नायजेरियन नागरिकांचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे.

सहा लाचखोरांना मुंबईतून अटक
मुंबई : लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जोरदार कारवाई सुरू असून मंगळवारी या विभागाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाई सहा लाचखोरांना अटक केली. यामध्ये दोन तलाठय़ांचा समावेश आहे. मंगळवारी धुळे आणि अमरावती येथे तलाठी सुभाष गवळी आणि विनोद इंगळे यांना अनुक्रमे ५०० आणि हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. नागपूर, पुणे आणि सोलापूर येथे भूमी अभिलेख कार्यालयातील अनुक्रमे वर्षां भगत, विठ्ठल झोडपे, कोकाटे या तिघांना पकडण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 2:51 am

Web Title: mumbai news news in mumbai mumbai city news 34
टॅग : Mumbai News
Next Stories
1 मतदारांनीच ‘औकात’ दाखवल्यानंतर आता राज ठाकरे मुंबईत सभा घेणार
2 निलंबीत अधिकारी फाटक, व्यास यांचे ‘आदर्श पुनर्वसन’!
3 ठाणे पालिकेविरोधात गुन्हा
Just Now!
X