तंत्रशिक्षण संस्थांच्या मान्यता व नियंत्रणाचे अधिकार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेलाच (एआयसीटीई) असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट करीत नवीन संस्था व अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी एक महिन्याची मुदतवाढही मंजूर केली. परिषदेचे हे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी काढले होते. त्यानंतर नुकत्याच एका प्रकरणात परिषदेलाच हे अधिकार असल्याचे सांगितले. त्यामुळे नेमकी बाजू स्पष्ट व्हावी म्हणून परिषदेने न्यायालयात अर्ज केला. त्यावर संस्थामान्यतेचे अधिकार परिषदेलाच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. नवीन संस्थांच्या मान्यता देण्यासाठी ३० मे ची तर अधिसूचना काढण्यासाठी १५ जूनची मुदत न्यायालयाने याआधीच एका प्रकरणात घालून दिली आहे.  आता मान्यतेची प्रक्रिया नव्याने सुरू करावी लागणार असल्याने परिषदेने केलेली मुदतवाढीची विनंती न्यायालयाने मान्य केली.

‘आयएनएस गंगा’ला आग, चारजण जखमी
 मुंबई : नौदलाच्या गोदीत दुरुस्ती सुरू असताना ‘आयएनएस गंगा’ या जहाजावर शुक्रवारी सकाळी लागलेल्या किरकोळ आगीत दोन खलाशांसह चार जण किरकोळ भाजले.गेल्या दहा महिन्यांतली नौदल बोटींबाबतची ही १५वी दुर्घटना असून फेब्रुवारीतील दुर्घटनेमुळे अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांना नौदल प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नौदलाने मात्र आग लागल्याचा इन्कार केला असून दुरुस्तीदरम्यान वेल्डिंग सुरू असताना गॅस गळतीमुळे हा अपघात घडल्याचा दावा केला आहे.  यावेळी अचानक मोठा आवाज झाला आणि ठिणग्या पडल्या. या किरकोळ आगीत खलाशासह दोनजण किरकोळ भाजले. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.सोमाली चाचांचा उपद्रव रोखण्यासाठी २०१२मध्ये एडनच्या आखातात ‘आयएनएस गंगा’ तैनात झाले होते.

 

ठाण्यात ज्वेलर्सवर दरोडा
ठाणे : येथील समतानगर भागातील राज गोल्ड ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरटय़ांनी सुमारे ७०० ग्रॅम सोन्याचे आणि १२ किलो चांदीचे असे सुमारे ३० लाख रुपयांचे दागिने लुटले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. विशेष म्हणजे दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची बॅकअप हार्डडीस्क चोरटय़ांनी चोरून नेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.   समतानगर परिसरात राहणारे संदेश जैन यांचे देवदया पार्कमध्ये राज गोल्ड हे ज्वलर्सचे दुकान आहे. रुग्णालयात असलेल्या आईला भेटण्यासाठी जैन गुरुवारी रात्री दुकानातुन लवकर निघाले होते. त्याचा भागीदार रात्री दुकान बंद करून घरी गेला होता. शुक्रवारी सकाळी जैन हे दुकान उघडण्यासाठी आले असता दुकान फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले.  

पोलिसाची वॉकीटॉकी पळविली
मुंबई : मोटारसायकलवरील दोन तरुणांनी चक्क पोलिसाचीच वॉकीटॉकी पळविल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे.  बांगूरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संजय राणे हे गुरुवारी रात्री गोरेगावच्या इनऑर्बिट मॉलजवळ बंदोबस्तासाठी उभे होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांना दोन तरुण मोटारसायकलीवरून संशयास्पद अवस्थेत येताना दिसले. त्यांनी या दोघांना अडवून थांबण्याचा इशारा केला. मात्र त्यांनी न थांबता राणे यांच्याकडील वॉकीटॉकी पळवून नेली.  

ठाण्यात महिलेची हत्या
ठाणे : किसननगर भागात एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. महानगरपालिका शाळा क्र. २३जवळ एका बंद दुकानाजवळ हा ड्रम टाकून देण्यात आला होता. स्थानिकांनी हा ड्रम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला.
या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात  या महिलेच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या भागात कोणी बेपत्ता झाले आहे का याची पोलीस तपास करत असल्याची माहिती श्रीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. जे. खैरनार यांनी दिली.

खालसा महाविद्यालय लाच प्रकरण :  स्वीय सहाय्यकाच्या पर्समध्ये लाखो रुपयांचे घबाड
 मुंबई : लाच प्रकरणात अटकेत असलेल्या खालसा महाविद्यालयातील प्राचार्याच्या स्वीय सहाय्यक निकीता वेद यांच्या पर्समध्ये चार लाख रुपये तर घराच्या झडतीत दहा लाखांच्या गुंतवणुकीचे कागदपत्रे सापडली आहेत. प्राचार्य अजितसिंग थेटी आणि निकीता वेद यांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
माटुंग्याच्या प्रख्यात गुरू नानक खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य अजितसिंग थेटी यांनी एका पालकाकडून १२ वी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी २५ हजारांची लाच मागितली होती. गुरुवारी ही लाच स्विकारताना थेटी यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यक निकीता वेद यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने अटक केली होती.

लोहारिया हत्येप्रकरणी अनुराग गर्गला अटक
मुंबई : नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनील लोहारिया हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनुराग गर्ग याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. गर्ग हाही बांधकाम व्यावसायिक आहे. १६ फेब्रुवारी २०१३ रोजी लोहारिया यांची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी अमोलिक आणि अन्य काही जणांना अटक केली होती. मात्र हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गर्ग फरार होता. गर्ग याने अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून लावून त्याला शरण येण्यास सांगितले होते. त्यानुसार गर्ग शुक्रवारी ठाणे न्यायालयात शरण आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.