‘म्हाडा’च्या घरांच्या किमती नुकत्याच कमी केल्यानंतर मुंबईकरांनी घरांच्या सोडतीला प्रतिसाद दिला असून मुंबई आणि कोकण विभागात आत्तापर्यंत एकूण १ लाख २३ हजार २५४ अर्ज दाखल झाले आहेत. मुंबई विभागासाठी १ लाख १० हजार ९१० तर कोकण विभागासाठी १२ हजार ३४४ अर्ज दाखल झाले आहेत.‘म्हाडा’ने यंदा मुंबईतील ८१४ तर विरार आणि वेंगुर्ला येथील एकूण १ हजार ८२७ अशा २ हजार ६४१ घरांसाठी सोडत काढली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. २५ जून रोजी सोडत निघणार आहे. घरांसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने ‘म्हाडा’ने किमती सुमारे ७० हजार ते तीन लाख ९० हजार रुपयांनी कमी केल्या होत्या. त्यानंतर अर्जाचा वेग वाढला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत एक लाख ४२ अर्ज दाखल झाले. तर विरार आणि वेंगुर्ला येथील कोकण मंडळाच्या घरांसाठी ११ हजार २४७ अर्ज दाखल झाले.
अर्जासोबत अनामत रक्कम भरलेल्या अर्जाची एकूण संख्या मुंबई आणि कोकण विभागात अनुक्रमे ७४ हजार १३६ आणि ७ हजार ९३४ इतकी आहे.

तक्रारदाराला पोलिसाची बेदम मारहाण
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार केली म्हणून एका तरुणाला पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल झाला असून लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागानेही त्याला अटक केली आहे. अमोल अवघडे (१९) या तरुणाविरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. नंतर त्याला जामीन मिळून सुटकाही झाली होती. परंतु त्याला पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागत होती. ही हजेरी बंद करण्यासाठी, लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश अडसूळ यांनी १५ हजारांची लाच मागितली होती. त्यामुळे लाचलुतपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची माहिती अडसूळ यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी अमोलला पोलीस ठाण्यात बोलावून पट्टयाने बेदम मारहाण केली.

तरण तलावात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
मुंबई : पोहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यांचा प्रख्यात क्लबमधील तरणतलावात बुडून मृत्यू झाला. पाण्यात असताना फिट आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. कांदिवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपन पालन (१२) हा विद्यार्थी बोरिवलीच्या शिंपोली येथे राहत असून येथील एमके शाळेत तो पाचवीत शिकतो. शनिवारी दुपारी तो कांदिवलीच्या ‘कंट्री क्लब’मध्ये पोहण्यासाठी गेला होता. काही वेळ पाण्याखाली पोहल्यानंतर तपन बेशुद्धावस्थेत तरंगत वर आला. त्याला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक घोडगे यांनी दिली.
दरम्यान, तपनच्या मृत्यूला कंट्री क्लबचे व्यवस्थापनच जबाबदार असल्याचा आरोप तपनेचे वडील धरम पालन यानी केला आहे. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिपत पांढरमिशे म्हणाल़े

ठाण्यात तरुणावर तलवारीने हल्ला
ठाणे : ठाणे येथील मल्हार सिनेमागृहाजवळ रविवारी रात्री चार ते पाच जणांच्या टोळीने सुनील गंगाराम कोडभर (३३) या तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली. वर्गणीतील पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. शिवा ठाकूर आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी हा हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या सर्व हल्लेखोरांचा नौपाडा पोलीस शोध घेत आहेत. नौपाडा परिसरात राहत असताना सुनील कोडभर आणि शिवा ठाकूर यांचे मित्र मंडळ होते. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आठ महिन्यांपूर्वी वर्गणी काढली होती. दरम्यान, या वर्गणीतील पैशांच्या हिशेबावरून दोघांमध्ये वाद झाले होते. यातूनच सुनीलवर हल्ला झाला. रविवारी रात्री सुनील एका मित्रासोबत मल्हार सिनेमागृहाजवळील टपरीवर सिगरेट घेत होता. त्या वेळी शिवा ठाकूर आणि त्याचे चार ते पाच साथीदार तेथे आले आणि त्यांनी सुनीलवर तलवारीने वार केले. हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करत सुनीलने मल्हार सिनेमागृहात धाव घेतल्याने तो बचावला, अशी माहिती पोलीस निरीक्षक मनजीतसिंग बग्गा यांनी दिली.

राज्यभर गोपीनाथ मुंडे यांच्या शोकसभा
मुंबई : ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थींचे विसर्जन कुटुंबियांकडून १२ जून रोजी पैठणला होणार असून १५-१६ जून रोजी मुंबईसह राज्यातील सात मोठय़ा शहरांमध्ये शोकसभा आयोजित करण्यात येत आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह मुंबईत तर नागपूर येथे सरसंघचालक मोहन भागवत शोकसभेस उपस्थित राहतील. मुंबईतील सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री चव्हाण उपस्थित राहणार आहेत. पुणे, लातूर, रत्नागिरी, नाशिक आणि अमरावती येथेही शोकसभा होणार असून सुषमा स्वराज, राजीवप्रताप रुडी आदी नेते या सभांसाठी येणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात अस्थिकलश नेऊन विसर्जन केला जाईल. भाजपशासित राज्यांमध्येही अस्थिकलश नेऊन विसर्जन केले जाईल, असे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले.