जे. जे. उड्डाणपुलावरून भरधाव जाणाऱ्या मोटरसायकलस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास हा अपघात घडला.नितीन पाठारे (२५) आणि सिद्धेश कदम (२३) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथचे दर्शन घेण्यासाठी बुधवारी रात्री ते मोटारसायकलवरून निघाले होते. नितीन त्मोटरसायकल चालवत होता. जे. जे. उड्डाणपुलावर नितीने मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजक ओलांडून मोटरसायकल पलीकडे फेकली गेली. त्या वेळी समोरून येणाऱ्या होंडा सिटी गाडीची धडक बसल्याने दोघे जखमी झाले. जे.जे. रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पायधुनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी निघाले असताना हे दोघे जे.जे. उड्डाणपुलावरून का जात होते, हे समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

मागासवर्गीय शुल्क परताव्याबाबत लवकरच निर्णय
सामाजिक न्यायमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : तंत्रशिक्षणासह उच्चशिक्षण संस्थांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्क परतावा देण्याबाबत दोन-तीन दिवसांत आदेश काढण्याचे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाला दिले. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने सोमवार (२४ फेब्रुवारी) च्या अंकात वृत्त दिले होते. त्यानंतर मनविसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मोघे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार प्रवीण दरेकर, वसंत गीते, मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, साईनाथ दुर्गे, परशुराम तपासे आदींनी याप्रश्नी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती संबंधितांना केली. शुल्क परतावा न दिल्याने महाविद्यालये विद्यार्थ्यांवर शुल्क भरण्यासाठी दबाव आणत आहेत व अन्य त्रासही देत असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

रेल्वे कामगार नेते उमरावमल पुरोहित यांचे निधन

मुंबई : वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष आणि माजी महामंत्री कॉ. उमरावमल पुरोहित (८६) यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. २३ फेब्रुवारी रोजी त्यांना जगजीवनराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उमरावमल पुरोहित हे विविध कामगार संघटनांशी जोडलेले होते.  पुरोहित यांना २३ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मृत्यूचा बनाव रचणारा गुन्हेगार अखेर गजाआड
मुंबई : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एका गुन्हेगार संचित रजा घेऊन तुरूंगाबाहेर पडला आणि त्याने आपल्या मृत्यूचा बनाव रचला. वेगळे नाव धारण करून तब्बल तीन वष्रे तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर एका घरफोडीच्या प्रकरणात कराड पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याचा हा बनाव उघड झाला.
सराईत गुन्हेगार असलेल्या चंदर नाडरने २००८ मध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती. या प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १४ जानेवारी २०११ रोजी तो १४ दिवसांची संचित रजा घेऊन कारागृहाबाहेर आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. पोलिसांनी शोध घेऊनही तो सापडला नाही. दरम्यान, ‘एड्स’मुळे  स्वत:चा मृत्यू झाल्याची बातमी चंदरने नातेवाईकांकरवी सर्वत्र पसरवली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध बंद केला. त्यानंतर त्याने गणेश मणी कुडूक हे नाव धारण केले. दरम्यान, कराड पोलिसांनी चंदरला एका घरफोडीच्या प्रकरणात अटक केली. त्याचा ताबा आझाद मैदान पोलिसांना देण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवलीत तीन आत्महत्या
 कल्याण :कल्याण-डोंबिवलीत गेल्या दोन दिवसात तीन जणांनी आत्महत्या केल्या असून त्यामागचे कारण समजले नाही. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील नंदी पॅलेस हॉटेलमध्ये अनिरूद्ध सावंत या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कल्याण पूर्वेतील विजयनगरमध्ये राहणाऱ्या छाया गायकर या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कल्याणच्याच  रामदासवाडी भागात पल्लवी सोनी राहत असून त्या  जखमी अवस्थेत आढळल्या. तर त्यांचे पती राहुल सोनी मृतावस्थेत आढळले असून त्यांनी गळफास घेतला.

चेंबूर येथील दहावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
मुंबई : परीक्षा तोंडावर आलेली असतानाच चेंबूरच्या जिजामाता नगर येथे राहणाऱ्या  राकेश जाधव  या (१६) दहावीच्या विद्यार्थ्यांने तणावापोटी गुरुवारी आत्महत्या केली.
दुपारी दोनच्या सुमारास जेवण झाल्यानंतर अभ्यास करण्यासाठी तो पोटमाळ्यावर गेला होता. साडेतीन वाजता त्याचा भाऊ त्याला बोलावण्यासाठी गेला असता त्याने पंख्याला गळफास लावल्याचे आढळले. त्याने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिट्ठी लिहिलेली नव्हती. परंतु दहावीच्या परीक्षेच्या तणावापोटी त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरसीएफ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

‘माढा’ चा तिढा सोडविण्यासाठी महायुतीत हालचाली
 मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना माढा मतदारसंघ सोडण्याबाबत विचार सुरु असल्याचे समजते. त्यांना नाराज केले तर, आजुबाजूच्या दोन-तीन मतदारसंघावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा महायुतीतील नेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांची समजूत काढून जानकरांना हा मतदारसंघ सोडून पेच सोडविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत