रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांची देखभाल करण्यासाठी पश्चिम रेल्वेमार्गावर गोरेगाव आणि बोरिवली या स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी जंबोब्लॉक घेण्यात येणार आहे. काही गाडय़ा रद्द करण्यात येणार असून काही जलद गाडय़ा गोरेगाव-बोरिवली या स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून चालवल्या जाणार आहेत. रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ असे पाच तास हे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत अप आणि डाउन जलद गाडय़ा या दोन स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून चालवल्या जातील. ब्लॉकच्या काळात बोरिवली लोकल बोरिवलीला ७, ८ आणि दोन या क्रमांकांवर नेण्यात येतील. तर विरार लोकल विरारला १ आणि ३ क्रमांकावर नेल्या जातील. ब्लॉकदरम्यान काही जलद व धिम्या गाडय़ा रद्द करण्यात येतील.

प्रतीक्षानगर येथील नव्या जलवाहिनीचे शनिवारी उद्घाटन
मुंबई : गेल्या काही वर्षांत विकासाच्या वाटेवर असलेल्या सायन प्रतीक्षानगर येथील तब्बल ७० हजार रहिवाशांच्या पाण्याची गरज भागवणाऱ्या नव्या जलवाहिनीचे उद्घाटन शनिवारी, २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते या जलवाहिनीचे उद्घाटन होणार आहे.
सायन प्रतीक्षानगर परिसरात मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांचे गाळे आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांत या परिसरातील रहिवाशांची संख्याही वाढली आहे. सध्या या परिसरात ७० हजारांहून अधिक लोक राहतात. या परिसराला आधी जुन्या जलवाहिनीद्वारे अल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत होता. ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती प्रसाद लाड यांनी पुढाकार घेतला. त्यांनी अधिक मोठय़ा व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी म्हाडाकडून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता.

शारीरिक शिक्षण विभागप्रमुखांविरोधात तक्रार
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रमुख शेफाली पंडय़ा यांच्याविरोधात जातीवाचक अपशब्द वापरल्याबद्दल एका विद्यार्थ्यांने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. निकाल कधी लागणार म्हणून विचारणा करण्यासाठी सलीम शेख हा विद्यार्थी ५ फेब्रुवारीला आपल्या दोन मित्रांसमवेत पंडय़ा यांच्या कार्यालयात गेला होता. त्यावेळी, पंडय़ा यांनी आपल्यावर जातीवाचक शेरेबाजी केली, असा सलीमचा आरोप आहे.
सलीम याच विभागात ‘एम.पी.एड’च्या पहिल्या वर्षांत शिकतो आहे. पंडय़ा यांनी पहिल्या मजल्यावरील कार्यालयापासून तळमजल्यापर्यंत आपल्याला जवळजवळ धक्के देत बाहेर काढले, असा सलीमचा आरोप आहे. सलीमने या प्रकाराची तक्रार कुलगुरूंकडे व राज्यापालांकडे केली आहे. या संबंधात पंडय़ा यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांचा मोबाइल फोन बंद असल्यामुळे प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.