30 October 2020

News Flash

संक्षिप्त : कुपोषण रोखण्यासाठी कीर्तनकारांची मदत

कुपोषणावर मात करण्यासाठी कीर्तनकारांची मदत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी अहमदनगरमधील नेवासा तालुक्यात

| February 12, 2014 12:01 pm

कुपोषणावर मात करण्यासाठी  कीर्तनकारांची मदत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी अहमदनगरमधील नेवासा तालुक्यात श्रीक्षेत्र देवगड संस्थानात कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री वर्षां गायकवाड यांनी मंगळवारी दिली.
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पठणच्या संतपीठाचे पीठाचार्य प्रकाश बोधले महाराज यांच्यासह जवळपास ६०० प्रबोधनकार आणि कीर्तनकार यात सहभागी होणार आहेत. कुपोषणाची समस्या, त्यावरील उपाय, योग्य स्तनपान, शिशुपोषण, चुकीच्या रुढी अशा विविध विषयांवर सामाजिक प्रबोधन करण्यासाठी या कीर्तनकारांचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत त्यांचे प्रबोधन केले जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. बालकांच्या जीवनातील पहिले हजार दिवस महत्त्वाचे, या पंचसूत्री कार्यक्रमाचे महत्त्वही कीर्तनकारांना पटवून दिले जाणार आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

७८६ क्रमांकामुळे चोर सापडले ; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध
मुंबई : ७८६ हा क्रमांक मुस्लीम धर्मीय भाग्याचा मानतात; परंतु दोन चोरांना हा क्रमांक अपशकुनी ठरला आहे. व्ही. पी. रोड पोलिसांनी मंगळवारी एका चोरीचा छडा लावून आरोपींना पकडले ते केवळ याच क्रमांकाच्या आधारे. मंगल जोशी यांचा कॅटरिंगचा व्यवसाय असून गुलालवाडी येथे त्यांचे गोदाम आहे. ७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या गोदामातील ५ लाख रुपये किमतीच्या सामानाची चोरी झाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना गोदामासमोर असलेल्या एका बँकेचे सीसीटीव्ही चित्रण मिळवले. त्यात या भागातून एक टेम्पो जाताना दिसला. त्याचा क्रमांक दिसत नसला तरी टेम्पोच्या दर्शनी भागावर ‘७८६’ हा क्रमांक लिहिलेला होता. हा धागा मिळताच पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सिराज खान (२७) आणि हकीम खान (२५) यांना अटक केली. हे दोघे जोशी यांच्याकडे काम करणारे नोकर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

लोहारिया खून प्रकरण : ‘आयपीएस अधिकाऱ्यांमधील दूरध्वनी संभाषणाचा अहवाल सादर करा’
मुंबई : नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार लोहारिया यांच्या खून प्रकरणातील मुख्य व फरारी आरोपी अनुराग गर्ग आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी ए. के. शर्मा यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणाची चौकशी केली की नाही याचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला दिले.  लोहारिया खून प्रकरणात शर्मा यांचे नावही पुढे आल्याने पोलीस तपासाबाबत विशेष करून या अधिकाऱ्याविरुद्धची चौकशी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केतन तिरोडकर यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. मुंबई पोलीस त्याच दबावाखाली प्रकरणाचा तपास करीत असल्याने प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची मागणी याचिकेत केली आहे. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली.

संदीप सेनवाल गोळीबार : आरोपीला अटक
मुंबई : ठाणे  रेल्वे स्थानकात संदीप सेनवाल या तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपीस मुंबई रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेने पनवेल येथून अटक केली आहे. सच्चिदानंद मौर्य असे या आरोपीचे नाव आहे. संदीप सेनवाल (३०) हा तरुण ८ नोव्हेंबर २०१३ रोजी ठाणे रेल्वे स्थानकातून आपल्या घरी जात असता अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला होता. संदीपच्या बहिणीचा प्रियकर रवी घरत यानेच हा गोळीबार घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला होता. रवी याने उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेने जखमी संदीपकडून संशयित हल्लेखोराचे रेखाचित्र तयार करून शोध सुरू केला होता. तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर मौर्य याला पनवेल येथून अटक करण्यात आली.

जंगली महाराज मार्ग बॉम्बस्फोट : एका आरोपीवरील ‘मोक्का’ हटविला
मुंबई : पुण्याच्या जंगली महाराज मार्गावर झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी फिरोझ अब्दुल हमीद सय्यद याच्यावरील ‘मोक्का’ अंतर्गत दाखल आरोप रद्द केले. त्यामुळे या प्रकरणातील अन्य आरोपींवरील ‘मोक्का’ हटण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. सय्यदने अर्ज करून आपल्यावरील ‘मोक्का’ हटविण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. आरोपींवर बेकायदा कारवाई प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि ‘मोक्का’ अशा दोन कायद्याअंतर्गत एकाच वेळी खटला चालविला जाऊ शकत नाही. एका वेळी एकाच कायद्याअंतर्गत खटला चालविला जाऊ शकतो, असा युक्तिवाद सय्यदच्या वकिलांनी केला होता. तो मान्य करीत न्यायालयाने सय्यदवरील ‘मोक्का’ अंतर्गत दाखल आरोप रद्द केले. त्यामुळे त्याच्यावर आता यूएपीएअंतर्गत खटला चालविण्यात येईल. या प्रकरणी अटकेत असलेल्या अन्य तीन आरोपींनीही सय्यदप्रमाणे अर्ज करून ही मागणी केल्यास त्यांच्यावरील ‘मोक्का’ही हटविला जाऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2014 12:01 pm

Web Title: mumbai news news in mumbai mumbai city news 8
टॅग Mumbai News
Next Stories
1 मनसेचे रास्ता रोको आंदोलन स्थगित; उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
2 मनसेचा शांततापूर्ण ‘खळ्ळ खटॅक’..
3 नोंदणीप्रक्रियेला फेरीवाल्यांचा विरोध
Just Now!
X