राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) शनिवारी सकाळी मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेवर (आयआरएफ) छापे टाकले. एनआयए आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. तत्पूर्वी शुक्रवारी एनआयएने धार्मिक द्वेष पसरविल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर कृत्यांप्रकरणी झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल केला होता. सध्या एनआयएकडून या सर्व कार्यालयांची झडती सुरू आहे. याबद्दल अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही.

वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बेकायदा कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. यापूर्वी स्वंयसेवी संस्थांना थेट विदेशी निधी मिळत होता. गृह मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विदेशी निधी घेण्यापूर्वी परवानगीची अट घातली होती. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला विदेशातून मिळणाऱ्या निधीच्या चौकशीचेही आदेश दिले होते.

तरुणांना दहशतवादाकडे वळविण्यासाठी त्यांचे ब्रेन वॉश केल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्याने आपण झाकीर नाईकच्या भाषणांना प्रेरित झाल्याचे म्हटले होते. तेव्हापासून झाकीर नाईक वादाच्या भोवऱयात सापडला आहे. पीस टेलिव्हिजनचाही झाकीर नाईकच्या संस्थेशी संबंध असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

मध्यंतरी केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’मध्ये काम करणाऱ्या अर्शी कुरेशी  या व्यक्तीस इसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी नाईक याच्या संदर्भातला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. या अहवालात झाकीर नाईक यांच्या संस्थेतून अनेक बेकायदा कृत्ये केली जात असल्याचे समोर आले आहे.