संदीप आचार्य 
मुंबई: मुंबईत अधिकाधिक करोना रुग्ण शोधून तात्काळ उपचार करता यावे यासाठी एकीकडे चाचण्यांची संख्या वाढविण्याचा तर दुसरीकडे यापुढे करोना चाचणीसाठी डॉक्टरच्या चिठ्ठीची गरज लागणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील करोना रुग्ण शोधण्याबरोबरच संपर्कातील व्यक्तींना युद्धपातळीवर शोधण्याची भूमिका घेत आयुक्त चहेल यांनी यापुढे लक्षणे असलेले तसेच नसलेली कोणतीही व्यक्ती डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करोना चाचणी करू शकेल असा निर्णय घेत त्याबाबतचा आदेश जारी केला आहे. हा आदेश जारी करतानाच दैनंदिन चाचण्यांची संख्या किमान दोन हजारांनी वाढविण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधितांना दिले. मुंबईतील चाचणी केंद्रांची क्षमता दहा हजार ते बारा हजार एवढी असताना प्रत्यक्षात गेले कित्येक दिवस सरासरी रोज चार ते साडेचार हजार चाचण्या होत असून यात रोज बाराशे ते पंधराशेच्या दरम्यान रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. मुंबईत एक लाख अॅन्टिबॉडीज चाचणी करण्याचे आयुक्त चहेल यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. आज आयुक्त चहेल यांनी चाचणी संख्या, रुग्ण वाढ व बरे होणारे रुग्ण तसेच उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला.

याबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना आयुक्त चहेल म्हणाले, मुंबईत रोज दोन हजार चाचण्या जास्त होतील याची काळजी घेतली जाईल. एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढवताना आता कोणालाही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय चाचणी करण्याला आम्ही मान्यता दिली आहे. यातून जास्तीत जास्त रुग्ण समोर येतील व लवकरात लवकर उपचार करणे शक्य होईल. मुंबईत आज ८६ हजार करोना रुग्ण असले तरी उपचाराखालील म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३,३५९ एवढीच आहे. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या बेडपैकी सुमारे पाच हजार बेड आज रिकामे असून रुग्णसंख्या दोन लाख झाली तरी मुंबईत आम्ही भक्कम आरोग्य यंत्रणा उभारल्याचे आयुक्त चहेल यांनी सांगितले. मुंबईत आज २३,३५९ अॅक्टिव्ह रुग्ण असताना मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात मात्र अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण गेल्या आठवड्यात २५ हजार होते ते वाढून आज २९,९८८ रुग्ण एवढी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुलुंड येथील नवीन तात्पुरत्या रुग्णालयातील काही बेड ठाणे पालिकेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.

राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,१८,५५८ एवढी म्हणजे
५४. ६ टक्के एवढे आहे तर मुंबईत ८६,५०९ करोना रुग्ण असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८,१३७ एवढी आहे. याचा विचार करता मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६७ टक्के एवढे असल्याचे आयुक्त चहेल यांनी सांगितले. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढवणे तसेच मृत्यूचे प्रमाण कमी करणे याला आता सर्वोच्च प्राधान्य असून यासाठीच करोना चाचणी सर्वांसाठी खुली करण्याबरोबरच चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai no longer needs a doctors prescription for corona testing scj
First published on: 07-07-2020 at 21:58 IST