उत्तर मध्य मुंबईतील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उत्तर मध्य मुंबई हा खरंतर काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्ता यांचा मतदारसंघ. पण त्या आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत अशी चर्चा आहे. त्यामुळे मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच या जागेसाठी मार्चेबांधणी सुरु केली आहे. या जागेसाठी अभिनेत्री नगमा यांचे नाव चर्चेत होते.

पण आता काँग्रेसचा मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा कृपाशंकर सिंह या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. कृपाशंकर सिंह यांनी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खऱगे यांच्याशी चर्चा केली असून लवकर निर्णय घेतला तर तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल असे त्यांनी सांगितले आहे.

मल्लिकार्जून खरगे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सध्यातरी मतप्रदर्शन करणे टाळले आहे. कृपाशंकर सिंह यांनी नकार दिलेला नाही. हायकमांडकडून मला जे आदेश मिळतील त्याचे मी पालन करीन असे कृपाशंकर सिंह यांनी सांगितले. अभिनेत्री नगमाने सुद्धा वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवण्यात रस दाखवला आहे.

ऑक्टोंबर महिन्यात प्रिया दत्त यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदाचा राजीनामा दिला. या मतदारसंघातील पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास कृपाशंकर सिंह यांनी सुरुवात केली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. त्याआधी २००४ साली प्रिया दत्त उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक जिंकल्या होत्या. त्यामुळे त्या सुद्धा इथून तिकिटासाठी दावा करु शकतात असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.