मनोज कोटक यांच्या विजयामुळे पद रिक्त

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक विजयी झाल्यानंतर मुंबई महापालिकेत गटनेतेपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत भाजप नगरसेवकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही नगरसेवकांनी गटनेतेपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी प्रयत्नही सुरू केल्याचे कळते.

मुंबई महापालिकेची फेब्रुवारी २०१७ मधील निवडणूक शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लढविली. शिवसेनेचे ८४, तर भाजपचे ८२ उमेदवार निवडून आले. शिवसेनेने आपल्याकडे चार नगरसेवक वळवले, तर भाजपला दोन नगरसेवकांना आपल्याकडे वळविण्यात यश आले.

संख्याबळ ८८ वर गेल्यामुळे शिवसेनेने पालिकेत सत्ता स्थापन केली. पण भाजप नगरसेवकांनी पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून पालिका सभागृहात बसणे पसंत केले. त्या वेळी भाजपने पालिकेच्या गटनेतेपदाची धुरा मनोज कोटक यांच्या खांद्यावर सोपविली.

शिवसैनिकांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केल्यामुळे अखेर भाजपने पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले.

राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांचा पराभव करून मनोज कोटक विजयी झाले. त्यामुळे आता पालिकेतील पक्षाच्या गटनेतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार याकडे भाजप नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. काही नगरसेवक विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत, तर काहींनी गटनेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे कळते.