शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून शिवसेनेतर्फे सोमवारी बंद पुकारण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. सोमवारी ‘बंद’ पुकारण्यात आल्याची चर्चा रविवारी जोरात सुरू होती. त्या पाश्र्वभूमीवर हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी मात्र सोमवारीही व्यवहार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ने (एफएएम) राज्यभरातील सर्व व्यापाऱ्यांना सोमवारी ‘श्रद्धांजली दिन’ पाळण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील सोने-चांदी व्यापाऱ्यांनीही बाळासाहेबांना आदरांजली म्हणून सोमवारी दुकाने बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. मात्र बँका, सरकारी कार्यालये, किरकोळ दुकाने सुरू राहणार आहेत.
यासंदर्भात असोसिएशनने पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी सोमवारी बंद ठेवून ‘श्रद्धांजली दिन’ पाळण्याचे आवाहन केले आहे. संघटनेशी संबंधित अन्नधान्य, साखर, सुकामेवा, धातू, पोलाद, स्टील आणि रसायने आदी सर्व व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.
मुंबईतील सराफांनीही सोमवारी बाळासाहेबांना आदरांजली म्हणून सोमवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी हा बाजार बंदच असतो. त्यामुळे बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणून सोमवारीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले.
एपीएमसीच्या बाजारपेठा सुरू
ठाणे:  बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत अन्नधान्य व मसाला बाजारपेठा बंद राहणार आहेत. इतर सर्व बाजारपेठा सोमवारी सुरू राहणार असल्याची माहिती एपीएमससीचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.
शाळा-महाविद्यालये आज बंद
मुंबई : मुंबईत निर्माण होणाऱ्या बंदसदृश परिस्थितीमुळे महाविद्यालयांनी सोमवारी (१९ नोव्हेंबर) ‘नो इन्स्ट्रक्शन’ दिवस पाळण्याचे ठरविले आहे. त्यामुळे, दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू होणारी मुंबईतील बहुतांश पदवी महाविद्यालये सोमवारीही बंद राहतील.  ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’नेही सोमवारी शाळांची बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळा’च्या शाळा २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने या शाळांचा प्रश्नच येणार नाही. परंतु, सीबीएसई, आयसीएसई, आयबी आदी शिक्षण मंडळाच्या शाळा दिवाळीच्या सुट्टीनंतर सोमवारपासून सुरू होणार होत्या.