गेले काही दिवस जोरदार कोसळणाऱ्या पावसाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी विदर्भ आणि कोकणात अधूनमधून मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
सध्या सुरू असलेला पाऊस उत्तरेकडे तसेच बंगालच्या उपसागरात आणि केरळ भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पटय़ामुळे पडत असल्याचे मुंबई वेधशाळेचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोकण आणि गोवा परिसरात आहे. पुढील ४८ तासांतही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुलाबा परिसरात शुक्रवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या कालावधीत २९.२ मिमि तर सांताक्रूझ परिसरात १२.४ मिमि पावसाची नोंद झाली आहे.