ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत किंचित सुधारणा

मेल-एक्स्प्रेस व लोकल गाडय़ांचा वक्तशीरपणा दोन महिन्यात ९० टक्क्यांपेक्षाही जास्त नेण्यात यावा, असे आदेश दिल्यानंतरही मध्य रेल्वेचा मुंबई विभाग त्यापासून दूरच आहे. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबपर्यंत मध्य रेल्वेचा मुंबई विभागातील मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचा वक्तशीरपणा केवळ ७८ टक्केच होता. त्यामुळे मुंबई विभाग वक्तशीरपणात देशभरात ४३ व्या क्रमांकावर राहिला. ऑगस्ट महिन्यात मुंबई विभाग ५५ व्या क्रमांकावर होता.

गेल्या काही महिन्यांपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या मुंबई लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वक्तशीरपणात घसरगुंडीच होत आहे. रुळाला तडा जाणे, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल बिघाड, लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या इंजिनात बिघाड यासह अन्य बिघाडही होतात. त्यामुळे वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो. वेळापत्रकाचा घसरलेला आलेख दोन महिन्यात ९० टक्क्यापर्यंत सुधारा, असे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतेच मध्य व पश्चिम रेल्वेला दिले होते. या आदेशानंतरही मुंबईतील लोकल व मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकात सुधारणा झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात तर त्यांचा बोजवाराच उडाला आहे. ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मेल-एक्स्प्रेसची कामगिरी ७०.९३ टक्क्यांपर्यंत होती, तर इतर ६९ विभागांच्या तुलनेत मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ५५ व्या क्रमांकावर होता. यात थोडीफार सुधारणा झाली असून २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबपर्यंत वक्तशीरपणा ७८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर मुंबई विभागाने ५५ व्या क्रमांकावरून थेट ४३ व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. पश्चिम रेल्वेचा मुंबई सेन्ट्रल विभागातील मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचा वक्तशीरपणाही याआधी ९४.९९ टक्के होता. त्यावेळी आठव्या क्रमांकावर असलेला मुंबई सेन्ट्रल विभाग आता सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विभागाचा वक्तशीरपणा ९५.८२ टक्के आहे.

दरम्यान, बुधवारी दादर स्थानकाजवळ रुळांच्या क्रॉस ओव्हरवर सायंकाळी ४.१५च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्याचवेळी या क्रॉस ओव्हरवरून दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनच्या दिशेने जाणारी लोकलही थांबली. क्रॉस ओव्हरवर ही गाडी अडकल्याने अप व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी अर्धा तास लागल्याने प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला.  सायकांळी सहा वाजेपर्यंत सीएसएमटी व कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडय़ांचा खोळंबाच उडाला होता.

रेल्वे सेवा विस्कळीत

दादर स्थानकाजवळ क्रॉस ओव्हरवर रुळांत बुधवारी सायंकाळीही अर्धा तास तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची मुख्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. लोकल गाडय़ांच्या वक्तशीरपणात अद्याप सुधारणा झालेली नसल्याचेही पुन्हा एकदा दिसून आले.