मुंबईमधील रुग्ण दुपटीच्या कालावधी शुक्रवारी सरासरी ३५० दिवसांवर आला असून, करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर स्थिर राहिले आहे. मुंबईत शुक्रवारी ६४२ जणांना करोनाची बाधा झाली, तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण दुपटीचा काळ गुरुवारी सरासरी ३२८ दिवस होता.

करोना संसर्गावर हळूहळू नियंत्रण मिळू लागले असून करोना वाढीचा दर ०.२१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मार्चपासून आतापर्यंत दोन लाख ८५ हजार ६३२ जणांना करोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत १० हजार ९७० रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर तब्बल दोन लाख ६६ हजार ४५६ जण करोनामुक्त झाले आहेत. आजघडीला सात हजार ३६२ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ४४५ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी ४४५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर १४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या २ लाख ३८ हजार १०५ इतकी झाली असून मृतांची संख्या ५ हजार ८६३ झाली आहे.

ठाणे शहरात १०९, कल्याण-डोंबिवली भागात ११७, नवी मुंबईत १०८, उल्हासनगरमध्ये सहा, भिवंडीत ९, मिरा भाईंदरमध्ये ३८, अंबरनाथमध्ये ९, बदलापूरमध्ये २२ आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रातील २७ रुग्णांचा सामावेश आहे. तर ठाण्यातील तीन, कल्याण डोंबिवलीमध्ये दोन, नवी मुंबईत दोन, भिवंडीत एक, मिरा भाईंदरमध्ये दोन, बदलापूरमधील तीन आणि ग्रामीण भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट

राज्यात गेल्या २४ तासांत ३,९९४ नवे रुग्ण आढळले असून, ७५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या ६० हजार उपचाराधीन रुग्ण असून, या संख्येत घट होत आहे. दिवसभरात ४४६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत नाशिक शहर २१८, पुणे शहर ३१३, पिंपरी-चिंचवड ११२, पुणे जिल्हा १२६, नागपूर शहर ३९२ नवीन रुग्णांची नोंद झाली.