मुंबईत गेल्या निवडणुकीपेक्षा १२ टक्क्यांनी मतदान वाढल्याने भाजप-शिवसेनेच्या गोटात आनंदाचे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भाजप-शिवसेनेला एकही जागा गेल्या वेळीजिंकता आली नसताना या वेळी मात्र चित्र उलटे होण्याची चिन्हे आहेत. मुस्लीम मतदारांमध्ये निरुत्साह आणि मराठी, गुजराती, दलित मतदारांमध्ये तसेच उच्चभ्रू वसाहतींमध्ये मतदानाचा उत्साह ओसंडत होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसघशीत वाढली आहे. त्याचा फायदा भाजप-शिवसेनेलाच होईल आणि मुंबईतील किमान पाच जागा पदरात पडतील, अशी आशेची पालवी युतीवर फुलली आहे.
नरेंद्र मोदी यांची लाट, भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकार अशा जोरदार प्रचारामुळे तयार झालेले काँग्रेसविरोधी वातावरण आणि ‘आता बदल हवाच’, असा भाजप-शिवसेनेने केलेला प्रचार यामुळे महायुतीला यश मिळण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियाचा वापर मोदी यांच्या प्रसिद्धीसाठी आणि तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने अतिशय सूत्रबद्धपणे केला. मोदी यांच्या महागर्जना सभेपासूनच मुंबईत वातावरणनिर्मिती केली जात होती. नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये भाजपने विशेष मोहीम घेतली होती. त्यानंतर मोदी यांच्या झालेल्या प्रचाराच्या समारोपाच्या सभेचा युतीच्या उमेदवारांना फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ‘आप’चा प्रभाव मुंबईत विशेष दिसून आला नाही.
भाजपविरोधात मनसेने मुंबईत उमेदवार न दिल्याने उत्तर मुंबईतील उमेदवार गोपाळ शेट्टी, ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या आणि उत्तर-मध्य मतदारसंघात पूनम महाजन या भाजप उमेदवारांना चांगलाच फायदा झाला. गेल्या निवडणुकीत मनसेमुळे त्यांच्या मतांचे विभाजन झाले होते. ईशान्य मुंबईत आपच्या मेधा पाटकर यादेखील रिंगणात असल्याने, झोपडपट्टय़ांमधील हमखास मतांचा वाटा आपकडे वळेल आणि मनसेच्या उमेदवारामुळे गेल्या वेळी युतीला बसलेला फटका या वेळी  आपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल, असे चित्र दिसते. ईशान्य मुंबई मतदारसंघात मुलुंड, घाटकोपर विभागांत गुजराती भाषिक मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांनी केलेल्या मतदानाचा फायदा किरीट सोमय्या यांना होणार आहे. विक्रोळी आणि दलित वसाहतींमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांनी केवळ अडीच हजार मतांमुळे किरीट सोमय्या यांचा पराभव केला होता. मात्र त्या वेळी मनसेमुळे सोमय्या यांच्या मतांचे विभाजन झाले होते. या वेळी हा फटका बसणार नाही.
काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा मजबूत गड भेदण्यासाठी पूनम महाजन यांची विलेपार्ले, वांद्रे, वाकोला, सांताक्रूज, कालिना परिसरांतील मराठी, गुजराती व अन्य भाषिक समाजावर अधिक भिस्त होती. तेथे जोमाने ५५ ते ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याने त्याचा फायदा महाजन यांना अपेक्षित आहे. कुर्ला, वांद्रे परिसरात सुमारे चार लाखांच्या आसपास असलेल्या मुस्लीम मतदारांमध्ये मात्र त्या तुलनेत उत्साह दिसून आला नाही. प्रिया दत्त यांचे बलस्थान असलेल्या तेथील मतदान केंद्रांवर कमी मतदान झाल्याने त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अबू आझमी यांचा मुलगा फरहान हेही निवडणूक लढवीत असून त्यांच्यामुळे प्रिया दत्त यांची काही मते फुटणार आहेत. उत्तर मुंबईत बोरिवली ते चारकोप पट्टय़ात असलेल्या सुमारे चार लाख गुजराती भाषिकांनी जोमाने मतदान केले. मराठी मतदारही मोठय़ा संख्येने मतदानासाठी उतरल्याचे चित्र होते. त्याचा फायदा गोपाळ शेट्टी यांना होणार आहे. हा मतदारसंघ परंपरेने भाजपचा होता. काँग्रेसने गोविंदाच्या रूपाने त्यावर कब्जा मिळविला आणि नंतर २००९ च्या निवडणुकीत मनसेमुळे संजय निरुपम यांचे नशीब फळफळले. आता येथे मनसेचा उमेदवार नाही आणि आपचे अस्तित्व नगण्य आहे.
  शिवसेनेने लढविलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांचे पारडे कमकुवत असल्याचे मानले जात होते. मिलिंद देवरा यांच्या विजयाची खात्री मानली जात होती. मात्र दक्षिण मुंबईतही गुजराती भाषिक मोठय़ा प्रमाणावर असून त्यांनी व मराठी समाजाने मोठय़ा प्रमाणावर मतदान केल्याने सावंत यांचा विजय अशक्यप्राय नाही. मनसेचे बाळा नांदगावकर यांचा विशेष जोर असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ते लाखभराचा टप्पाही जेमतेम गाठतील, अन्यथा तीही शक्यता नाही. ‘आप’च्या मीरा संन्याल या विजयाचा दावा करत असल्या तरी मतदार मात्र तो फारशा गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे आपचे अस्तित्व तिसऱ्या क्रमांकापुरते असेल अशीच शक्यता आहे.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील धारावी, अणुशक्तीनगर, चेंबूर, चित्ता कँप परिसरात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचे वर्चस्व आहे. तेथे चांगले मतदान झाले. मनसेचे आदित्य शिरोडकर यांच्यामुळे शिवसेनेचे राहुल शेवाळे यांना फटका बसणार असला तरी वाढलेल्या मतदानाने त्याचा परिणाम कमी होण्याची शक्यता आहे. दादर-माहीम हा परिसर म्हणजे शिवसेना व मनसेसाठीही प्रतिष्ठेचा आहे. तेथे मराठी मतांचे विभाजन होऊन शिवसेनेला त्या परिसरात तोटा होईल. मात्र राहुल शेवाळे यांना अन्यत्र आघाडी मिळू शकेल, असे चित्र आहे. काँग्रेसचे गुरुदास कामत यांचे वर्चस्व असलेल्या अंधेरी परिसरात चांगले मतदान झाले. मात्र या वेळी शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या गोरेगाव, जोगेश्वरी भागात जोमाने मतदान झाल्याने गजानन कीर्तिकर यांचा लाभ होऊन ही लढत चांगलीच चुरशीची होईल.
ठाणे जिल्हाही महायुतीकडे?
ठाण्यातील चुरशीच्या लढतीचा अपवाद वगळता कल्याण, पालघरमध्ये महायुती तर भिवंडीत काँग्रेसच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंब्रा परिसरात मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसल्याने कल्याण मतदारसंघात डॉ. श्रीकांत िशदे यांच्या विजयाची शक्यता वर्तविली जात आहे. नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरात सुमारे पाच लाखांच्या घरात मतदान झाल्याने नाईक यांच्या आशा अजूनही पल्लवित आहेत. भिवंडीत मात्र मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये वाढलेल्या मतदानामुळे काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांच्या विजयाची शक्यता असून पालघर मतदारसंघात ६० टक्क्यांच्या घरात पोहचलेले मतदान भाजपच्या अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचा उत्साह वाढविणारे ठरले आहे.
ठाणे ५२%
२००९ – ४१.५०%