मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या आठवड्याभरात ८ ते १० हजारांच्या दरम्यान स्थिर झाली आहे.  शुक्रवारी ८,८३९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ५३ रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १७.४९ टक्के होते. दिवसभरात जितके  नवे रुग्ण आढळले त्यापेक्षा जास्त म्हणजेच ९,०३३ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.

मुंबईत शुक्रवारी ८ हजार ८३९ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे  एकूण बाधितांची संख्या ५ लाख ६१ हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात ९ हजार ३३ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ४ लाख ६३ हजार ३४४ म्हणजेच ८२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती; मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दरही ७९ टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. हा दर किंचित वाढून ८२ टक्के झाला आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. ही संख्या ९२ हजारांपुढे गेली होती. ती शुक्रवारी आणखी कमी होऊन ८५ हजार २२६ झाली आहे. त्यापैकी ८० टक्के म्हणजेच ७० हजार ४६ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर १८ टक्के म्हणजेच १६ हजार ७३ रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या १ हजार ३२४ झाली आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. गुरुवारी ५० हजार ५३३ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १७.४९ टक्के नागरिक बाधित आहेत. आतापर्यंत ४८ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात ३६ पुरुष व १७ महिलांचा समावेश आहे. ३७ मृतांचे वय ६० वर्षांवरील होते, तर २६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. १३ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. तीन मृतांचे वय ४० वर्षांखालील होते. मृतांची एकूण संख्या १२ हजार २४२ झाली आहे.

मुंबईतील रुग्णांचा आकडा दररोज वाढत असला तरी तो या आठवड्यात काहीसा कमी झाला आहे. सध्या हा दर १.६० टक्के आहे. तो गेल्या आठवड्यात दोन टक्के होता. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधीही ३४ दिवसांवरून ४३ दिवसांपर्यंत वाढला आहे.

मुंबईत रुग्णांच्या संपर्कातील ३८ हजार नागरिकांचा शोध रविवारी घेण्यात आला. त्यापैकी २८ हजारांहून अधिक नागरिक हे अतिजोखमीच्या गटातील आहेत, तर १० हजारांहून अधिक नागरिक हे कमी जोखमीच्या गटातील आहेत.

लसीकरणाचा वेग वाढला

लसीकरणाचा वेग पुन्हा एकदा वाढला असून शुक्रवारी ४७ हजार ७२४ लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी १० हजार ९९६ लोकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली. आतापर्यंत १८ लाख ९१ हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी २ लाख ३१ हजारांहून अधिक लोकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. सध्या मुंबईत १२६ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. शनिवारपासून मुंबईत घाटकोपर येथे संत मुक्ताबाई या पालिकेच्या रुग्णालयात नवीन केंद्राची सुरुवात होणार आहे.