लवचिकता, चपळाई, साहस, धैर्य या सर्व शब्दांचे प्रत्यक्ष अर्थच आज मुंबईकरांना थेट शिवाजी पार्कवर अनुभवता आले. एकाच मोटरसायकलवर तब्बल २७ जणांनी तोल सांभाळत साकारलेला अप्रतिम पिरॅमिड असो किंवा १० हजार फूट उंचीवर पॅराट्रपर्सनी उडी मारत ताशी २०० किलोमीटर्सच्या वेगाने शिवाजी पार्कच्या दिशेने मारलेला सूर असो.. या कसरतींदरम्यानचे तीन तास मुंबईकर बहुतांश काळ श्वास रोखलेल्या अवस्थेतच होते!
१९७१ साली झालेल्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या युद्धाच्या स्मृती जागविण्याच्या निमित्ताने आज व उद्या दोन दिवस शिवाजी पार्क येथे भारतीय लष्करातर्फे विजय मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ११ वाजता या मेळ्याची सुरुवात झाली. अगदी सुरुवातीसच १० हजार फुटांवरून सूर मारत पॅराट्रूपर्स शिवाजी पार्कवर उतरले. ते तब्बल ताशी २०० किलोमीटर्सच्या वेगात खाली येत आहेत, हे जाहीर होताच सर्वाचे श्वास रोखले गेले आणि ते सुखरूप उतरल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. कॅप्टन वर्मा यांनी या स्काय डायव्िंहगचे नेतृत्त्व केले. त्या पाठोपाठ दोन हेलिकॉप्टर्स शिवाजी पार्कवर घोंघावू लागली. आणि आठ सैनिक दोरखंडाच्या मदतीने पार्कवर उतरले. त्यानंतर पुन्हा सुरू झाल्या त्या श्वास रोखायला लावणाऱ्या युद्ध कवायती.. शत्रूपक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी वेगात झालेल्या हालचाली आणि वीजेची चपळाई.. उद््ध्वस्त करण्यात आलेले बंकर्स आणि शत्रूला चारी मुंड्या चीत केल्यानंतर जवानांची निघालेली विजय फेरी. कसरतींमध्ये कधी वीरश्री तर कधी विजयश्री असे भावनांचे हिंदोळे सतत सुरू होते आणि त्याची लाट प्रेक्षकांमध्ये उमटत होती.
त्यानंतर जबलपूरच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या ‘डेअर डेव्हिल टीम’ने कॅप्टन अभिजीत महिलावत यांच्या नेतृत्त्वाखाली मोटरसायकलवरील थरारक कसरती सादर केल्या. एकूण २७ जणांचा समावेश असलेल्या या टीमने प्रथम क्रिसक्रॉसिंग नंतर स्युसायडल क्रॉस्िंाग अशा एकापेक्षा एक थरारक कसरतींनी श्वास रोखायला लावला. तब्बल २७ जणांनी तोल साधत एकाच मोटरसायकलवर सादर केलेले शिखर म्हणजे तर या कसरतींचा परमोच्चबिंदूच होता. ११ मोटरसायकलसह तब्बल २५१ जणांनी केलेल्या पिरॅमिडसह तब्बल २०० मीटर्सचे अंतर सहज कापणारा हा जगातील एकमेव चमू असून त्यासाठी त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदले गेले आहे. हे सारे सुरू असताना दुसरीकडे सुभेदार इंदरकुमार आणि रमेश यांनी विदूषकाच्या वेशात मोटरसायकलवर कधी व्यायाम तर कधी मारामारी, कधी हात व पायही न लावता तोल साधत वाहन चालवणे अशा अचाट कसरती करून दाखवल्या.
समारोप केला तो महाराष्ट्र लाइट इन्फ्रंट्री रेजिमेंटच्या पथकाने. त्यांनी शिवरायांना मानवंदना देत लेझिम, दहिकाला व महाराष्ट्रीय नृत्यप्रकार सादर केले. या कसरती संपत असताना भारतीय नौदलाच्या तुकडीने कोणत्याही आदेशांशिवाय सादर केलेल्या संगीनींच्या सादरीकरणास तुफान प्रतिसाद लाभला. अतिशय कठीण कसरती त्यांनी कोणत्याही आदेशांशिवाय केवळ नजरेची काटेकोर हालचाल आणि कसून केलेला सराव यांच्याबळावर सादर करत मुंबईकरांची मने जिंकली. या तुकडीचे नेतृत्त्व कमांडंट मोहम्मद यांनी केले. उद्यादेखील सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत या कसरती पुन्हा सादर होणार असून राज्यपाल व लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख अधिकारी यावेळेस प्रमुख पाहुणेम्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षा कडक असल्याने मुंबईकरांनी वेळेपूर्वीच उपस्थित राहावे, असे आवाहन लष्करातर्फे करण्यात आले आहे.

‘फेसबुकच्या फोटोअपडेट’साठी..
या प्रदर्शनामध्ये लष्करातर्फे वापरला जाणारा दारुगोळा, शस्त्रे सारे काही मांडण्यात आले होते. ते पाहण्यासाठी दुपारी २ वाजल्यानंतर मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने मुंबईकर हे प्रदर्शन पाहण्यासाठी लोटले होते. टी ७२, टी९० या रणगाडय़ांना त्याचप्रमाणे बोफोर्सला लोकांची विशेष पसंती होती. मुंबईकर या रणगाडय़ांवर विरश्रीसह आरूढ झाले होते. त्यात लहान मुलांपासून ते आजी- आजोबांपर्यंत सर्वाचा उत्साह सारखाच होता. ‘फेसबुकच्या फोटोअपडेट’साठी ही धडपड असल्याची चर्चा उपस्थितांमध्येच रंगली होती. एनसीसीच्या कौस्तुभ या छात्रसैनिकाने सादर केलेल्या एरोमॉडेलिंगकडेही लोकांचे लक्ष वेधले गेले होते. एकूण काय तर शिवाजी पार्कवरच्या स्मारकाचा वाद विसरून सर्व मुंबईकर आज लष्करमय झाले होते!