मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात सर्वांनाच परिचित असणारे ज्येष्ठ छायाचित्रकार विवेक बेंद्रे यांचं करोनामुळे रविवारी सकाळी निधन झालं आहे. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे माध्यम विश्वातून आणि मुंबईच्या क्रिकेट वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. १७ एप्रिल रोजी ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे त्यांना मुंबई पालिकेच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला होता. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्यामुळे २३ एप्रिल रोजी त्यांना वॉर्डमधून ऑब्जर्व्हेशन रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र, अखेर करोनाविरोधातल्या या लढ्यामध्ये २५ एप्रिल रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

क्रिकेट हा विवेक बेंद्रे यांचा आवडता विषय होता. १९९५ सालापासून द हिंदू वृत्तपत्रासाठी ते छायाचित्रण करत होते. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या बहुतेक सामन्यांचं छायाचित्रण करण्यासाठी बेंद्रे हजर असायचे. त्यामुळे मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात विवेक बेंद्रेंना ओळखणार नाही असा माणूस सापडणं कठीण होतं! त्यांच्या निधनानंतर ट्विटरवर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.