महालक्ष्मीच्या शक्ती मिलमध्ये २२ ऑगस्ट रोजी एका छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी ६०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात ८६ साक्षीदार, १८ पंचनामे व २२ डीएनए चाचण्यांच्या अहवालाचा समावेश आहे.
देशभर खळबळ उडविणाऱ्या या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने पूर्ण करून पाचही आरोपींना अटक केली होती. सलीम अन्सारी, कासम बंगाली, विजय जाधव, सिराज रेहमान खान या चौघांसह एका अल्पवयीन आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तपासासाठी १२ अधिकाऱ्यांसह ४२ पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. गुन्हे शाखेने गुरुवारी दुपारी किल्ला न्यायालयात हे ६०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात एकूण ८६ साक्षीदार असून १८ पंचनाम्यांचा समावेश असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी दिली. पोलिसांनी एकूण ८ मोबाइल तपासले आहेत. या प्रकरणात पहिल्यांदाच पोलिसांनी कलम १६४ (५) (२) अन्वये पीडित तरुणीचा जबाब नोंदविला आहे. त्यामुळे खटल्याच्या वेळी तिच्या अनुपस्थिततही तो ग्राह्य मानला जाणार आहे. अल्पवयीन आरोपीवरील आरोपपत्रही ६०० पानांचे असून ते बालन्यायालात सादर करण्यात आले.
टेलिफोन ऑपरेटर बलात्कार: चौघांना पोलीस कोठडी
३१ जुलै रोजी याच शक्ती मिलमध्ये १९ वर्षीय टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना २३ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यात कासम बंगाली, विजय जाधव, सलीम अन्सारी याच्यासह मोहम्मद अश्फाक शेख यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे.
८६ साक्षीदार, २२ डीनएन नमुने
पोलिसांनी या प्रकरणात एकूण ८६ साक्षीदार बनवले आहेत. त्यात पीडित तरुणीचे नातेवाईक, डॉक्टर, कार्यालयीन सहकारी, सिमकार्ड विक्रेते, आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग दर्शविणारे प्रत्यक्षदर्शी आदींचा समावेश आहे. पोलिसांनी एकूण २२ डीनएन नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात आरोपींचे कपडय़ांवरील डाग, पीडितेच्या शरीरावरील डाग आदींचा समावेश आहे. पोलिसांनी एकूण ८ मोबाईल तपासले आहेत. मोबाईलच्या ठावठिकाण्यावरून (सीडीआर) आरोपीं आणि पीडित तरुणी त्या दिवशी घटनास्थळावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींनी मोबाईमधून काही छायाचित्रे नष्ट केली आहेत का त्याचा तपासणी अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत प्रलंबित आहे. तो आल्यावर आरोपींविरोधात आयटी कलमानुसारही गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. आरोपपत्र दाखल होताच न्यायाधीशांनी प्रकरण सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे वर्ग केले. येत्या सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.