घाटकोपर या ठिकाणी गुरुवारी दुपारच्या सुमारास विमान कोसळून त्यात बसलेले चारही जण ठार झाले. तर एक पादचारी ठार झाला, मात्र एअर ट्रॅफिक कंट्रोलने वैमानिकांशी संपर्कच होऊ शकला नाही असे म्हटले आहे. या विमानाने टेक ऑफ केले, त्यानंतर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही या सूचनाही दिल्या की विमान कोसळू शकते, इमारतींवर आदळू शकते पण वैमानिकांशी संपर्कच होऊ शकला नाही असे जुहू आणि सांतक्रूझ येथील एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

१२ सीटचे हे विमान गुरुवारी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर कोसळले. या घटनेत एक पादचारी ठार झाला तर विमानातले सगळे चारही कर्मचारी ठार झाले. घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून हे विमान यू वाय अॅव्हिएशन या कंपनीचे होते. वैमानिक मारिया झुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही दुर्दैवी अंत झाला. VTUPZ किंगएअर सी ९० हे या चार्टर्ड विमानाचे क्रमांक होते. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

यू वाय एव्हिएशन कंपनीचे किंग एअर सी ९० एअरक्राफ्ट VT-UPZ हे विमान घाटकोपरमध्ये कोसळले. यू वाय अॅव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्तर प्रदेश सरकारकडून हे विमान २०१४ मध्ये खरेदी केले होते. बुधवारी दुपारी या विमानाने जुहू विमानतळावरुन चाचणीसाठी उड्डाण केले. विमानात दोन वैमानिक आणि एअक्राफ्ट मेंटेनन्स विभागातील दोन कर्मचारी होते. विमान अपघात झाल्यापासून विविध प्रकारची माहिती समोर येते आहे. त्यातच वैमानिकांशी संपर्क झाला नाही असे ATC ने म्हटले आहे.

वैमानिक मारिया झुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया यांनी यू. वाय. अॅव्हिएशन कंपनीवर गंभीर आरोप केले. विमान उड्डाण करण्यासाठी हवामान खराब होते असे मारियाने सांगितले होते तरीही कंपनीने जबरदस्तीने उड्डाण करण्यास भाग पाडले असा आरोप कथुरिया यांनी केला होता. मात्र हा आरोप कंपनीने खोडून काढला आहे. मारियाने असे काहीही सांगितले नव्हते. वैमानिक मारिया आणि इतर कर्मचाऱ्यांनी विमान टेक ऑफ करण्याआधी त्याची पूजा केली होती असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे मुख्य सुरक्षा अधिकारी संतोष पांडे यांनी ही माहिती दिली.