घाटकोपरमध्ये यू. वाय. कंपनीचे विमान गुरुवारी अपघातग्रस्त झाले. हे विमान अपघातग्रस्त झाल्यावर त्यासंदर्भातली विविध माहिती समोर येते आहे. अशात लातूरमध्ये २५ मे २०१७ ला मुख्यमंत्र्यांचे जे हेलिकॉप्टर पडले होते ते देखील यू. वाय. कंपनीचेच होते अशी माहिती समोर आली आहे. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर चारजण २५ मे २०१७ ला झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी या हेलिकॉप्टरने टेक ऑफ केले आणि अवघ्या काही क्षणात ते कोसळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेलिकॉप्टरमधील चार जण बचावले. गुरुवारी झालेल्या घटनेनंतर पुन्हा या अपघाताचीही चर्चा झाली. त्यावेळी हे हेलिकॉप्टरही यू. वाय. कंपनीचे असल्याची माहिती समोर आली आहे.

घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून हे विमान यू वाय अॅव्हिएशन या कंपनीचे होते. वैमानिक मारिया झुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही दुर्दैवी अंत झाला.