यू वाय एव्हिएशन या कंपनीचे विमान घाटकोपरमध्ये कोसळल्याच्या पार्श्वभूमीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या कंपनीचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.

घाटकोपरमध्ये गुरुवारी यू वाय एव्हिएशन या कंपनीचे चार्टर्ड विमान कोसळले. यात दोन वैमानिक, दोन अभियंते आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. खराब हवामान असल्याने वैमानिकांनी उड्डाणास नकार दिला होता. मात्र, यू वाय एव्हिएशन कंपनीने उड्डाणासाठी दबाव आणला होता. त्यामुळे या अपघाताला कंपनीचे अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोप दुर्घटनेतील मृत वैमानिकांच्या कुटुंबियांनी केला होता. तर लातूरमध्ये २५ मे २०१७ रोजी मुख्यमंत्र्यांचे जे हेलिकॉप्टर पडले होते ते देखील यू. वाय. कंपनीचेच होते अशी माहिती समोर आली आहे.

घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. घाटकोपरमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेनंतर यू वाय कंपनीचा परवाना रद्द करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी केली.

घाटकोपरमध्ये यू वाय कंपनीचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. या कंपनीचा अनुभव फक्त चार वर्षाचा आहे. या कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी विमानसेवा देण्याचा ठेका दिला होता. त्यानंतर दोनदा मुख्यमंत्री विमान अपघातातून वाचले. नंतर याच कंपनीचे विमान गुरुवारी कोसळले आहे. उत्तरप्रदेशचे भंगार खरेदी करुन एखादी विमानसेवा कोण चालवत असेल तर हा विषय गंभीर आहे. या अगोदरच्या अपघाताची चौकशी का झाली नाही असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला.