Mumbai Plane Crash: घाटकोपरमधील विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पादचाऱ्याची ओळख पटली असून गोविंद श्रीनाथ दुबे (वय ३६) असे या पादचाऱ्याचे नाव आहे. गोविंद हा गुरुवारी जीवदया लेनमधील एका घराच्या दरवाजे आणि खिडक्यांचे माप घेऊन निघाला आणि त्याला मृत्यूने गाठले. गोविंदचा हा रोजचा रस्ता नव्हता, अशी माहितीही समोर आली आहे.

घाटकोपर पश्चिमेतील जीवदया लेनमध्ये गुरुवारी दुपारी चार्टर्ड विमान कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. यात दोन वैमानिक, दोन अभियंते आणि एका पादचाऱ्याचा समावेश होता. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. विमानातील जळते इंधन रस्त्यावर फेकले गेले. तेच रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या गोविंद दुबे उर्फ पंडितच्या अंगावर उडाले आणि तो जळून खाक झाला. त्याचा चेहराही देखील स्पष्ट दिसत नव्हता. मात्र, पाकिटातील कागदपत्रांवरुन त्याची ओळख पटली.

गोविंद दुबे हा कामगार असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील जौनपूरचे रहिवासी आहे. त्याचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते, अशी माहिती त्याचे बंधू गोपाल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. गोविंद दुबे हे विमान कोसळले त्या बांधकाम साईटजवळील एका इमारतीमध्ये खिडकी आणि दरवाज्याचे माप घेण्यासाठी गेले होते.

‘१२. १५ च्या सुमारास आमचे काम झाले होते. मी लवकर निघालो आणि काही वेळाने गोविंदही तिथून निघणार होता. गोविंद त्या रस्त्याने का जात होता, हे मला अजूनही समजत नाहीये. तो घाटकोपर स्टेशनला जाण्याऐवजी स्टेशनच्या विरुद्ध दिशेला जात होता’, असे विश्वकर्मा यांनी सांगितले. गोविंद ऑफिसमध्येच परतत होता, पण तो त्या मार्गावरुन का जात होता हे समजत नाही, असे त्यांनी नमूद केले. विश्वकर्मा हे काँट्रेक्टर आहेत.

‘दुपारी एक नंतर आम्ही त्याला फोन करत होतो. पण त्याचा फोन लागत नव्हता. मग आम्हाला विमान दुर्घटनेची माहिती समजली. यानंतर आम्ही रुग्णालयात धाव घेतली. गोविंदचा मृत्यू झाला आहे हे आम्ही त्याच्या पत्नीला रात्रीपर्यंत सांगितले नाही’, असे गोविंद यांचे बंधू गोपाल यांनी सांगितले.