Mumbai plane crash: घाटकोपरमधील विमान अपघाताबाबत यू वाय अॅव्हिएशन या कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे. वैमानिक आणि सहवैमानिकाला विमान उड्डाणाचा दांडगा अनुभव होता. मुख्य वैमानिकाला पाच हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, असे कंपनीने म्हटले आहे.

यू वाय अॅव्हिएशन कंपनीचे किंग एअर सी ९० एअरक्राफ्ट VT-UPZ हे चाचणीसाठी निघालेले विमान गुरुवारी दुपारी घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील चार जणांचा मृत्यू झाला. वैमानिक मारिया झुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे अशी या चौघांची नावे आहेत. तर गोविंद पंडित या पादचाऱ्याचाही अपघातात मृत्यू झाला.

अपघातानंतर यू वाय अॅव्हिएशन म्हटले आहे की, वैमानिक आणि सहवैमानिक दोघेही आमच्या कंपनीतील कर्मचारी होते आणि दोघांनाही विमान उड्डाणाचा दांडगा अनुभव होता. मुख्य वैमानिकाला जवळपास ५ हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. तर सहवैमानिक हा पूर्वी जेट एअरवेजमध्ये कामाला होता. तर इंजिनीअर आणि टेक्निशियन हे दोघेही इंडामेर या कंपनीचे कर्मचारी होते. आम्ही मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून पोलीस आणि डीजीसीएला देखील तपासात सहकार्य करत आहोत.

‘गेल्या २२ वर्षांपासून हे विमान वापरात होते. हे विमान आमच्या कंपनीने विकत घेतले होते. हे विमान आम्ही इंडामेरला देखभाल-दुरुस्तीसाठी दिले होते. आज सकाळी या विमानाने चाचणीसाठी उड्डाण केले. चाचणीत हिरवा कंदील मिळाल्यावर हे विमान कंपनीच्या ताफ्यात दाखल होणार होते. जुहूतून उड्डाण केल्यानंतर हे जवळपास एक तास हवेत होते. जुहूत लँडिंगची तयारी सुरु असतानाच हा अपघात झाला, असे कंपनीने म्हटले आहे.