X

मनसे नेते नितीन नांदगावकरांना तडीपारची नोटीस

मनसेमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे..

मुंबई पोलिसांनी मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना दोन वर्षे तडीपारची नोटीस बजावली आहे. मुंबईसह उपनगरातून त्यांना तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे. पासपोर्ट घोटाळा, ड्रग्स विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी नांदगावकर यांनी उघड केली होती. त्यासाठी कायदा हातात घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच नांदगावकर यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा ठपका ठेवत तडीपार करण्यात आले आहे. स्वत: नितीन नांदगावकर यांनी फेसबूक व्हिडीओच्या माध्यमांतून ही माहिती दिली आहे.

आज बुधवारी नांदगावकर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या नोटिसीला उत्तर देताना संघर्ष अटळ असल्याची प्रतिक्रिया नांदगावकर यांनी फेसबुकवर दिली आहे. माझी भीती नेमकी कोणाला वाटतेय? सर्वसामान्य नागरिकांना माझी भीती वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुबंई पोलीस कामाला लागले आहेत. महाराष्ट्र माझा आहे. कुठे कुठे मला तडीपार करणार? जनतेने सांगावे मी कुठे चुकतोय? मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणार, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर नांदगावकर यांची तडीपारी करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे मनसेने या कारवाईला विरोध सुरू केला आहे. ट्विटरवर #isupportnitinnandgaonkar या नावाने मोहिम सुरू केली आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सनी नांदगावकर यांना पाठींबा दिला असून आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First Published on: February 20, 2019 11:17 pm
  • Tags: mns,