उपायुक्तांची कानउघाडणी, लाचखोर अधिकारी बडतर्फ

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एकाच आठवडय़ात तीन अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने बृहन्मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल धास्तावले असून त्यांनी तातडीने पोलीस उपायुक्तांची बैठक बोलावून सर्वाची कानउघाडणी केली.‘एसीबी’ने अटक केलेल्या एका अधिकाऱ्याला तडकाफडकी बडतर्फही करण्यात आले आहे.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार या तीन कारवायांव्यतिरिक्त अन्य एका पोलीस अधिकाऱ्याविरोधातील तक्रारीची माहिती आयुक्तांना मिळाली. ज्यात एका अधिकाऱ्याने तक्रारदार आणि संशयित आरोपी अशा दोघांकडे पैशांची मागणी केली होती. या दोघांपैकी एका पक्षाने ‘एसीबी’कडे तक्रार न करता अतिरिक्त  आयुक्ताकडे तक्रार केली होती.

अधिकारकक्षेत येणाऱ्या पोलीस ठाण्यांना, शाखांना भेट द्या, तेथे नियुक्त मनुष्यबळाला योग्य ती समज द्या, समुपदेशन करा आणि लाचखोरीपासून प्रवृत करा, अशा सूचना जयस्वाल यांनी उपायुक्तांना दिल्या. त्याच दिवशी देवनार पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस निरीक्षक दत्तात्रय चौधरी यांना तडकाफडकी सेवेतून बडतर्फही केले. चौधरी यांना बचावाची संधी देणे, कारणे दाखवा नोटीस धाडणे यापेक्षा बडतर्फ करणे योग्य ठरेल, असे जयस्वाल यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

कारवाईचे सत्र

  • ११ फेब्रुवारी- गोवंडी पोलीस ठाण्याचे साहाय्यकनिरीक्षक दीपक खरात यांना तृतीयपंथीयाकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना ‘एसीबी’ने पकडले.
  • १३ फेब्रुवारी- देवनार पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय चौधरी हे ८० हजार रुपयांची लाच घेताना ‘एसीबी’च्या सापळ्यात अडकले.
  • १५ फेब्रुवारी- खेरवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शाम आयरे यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले.