मुंबई : कर्नाटक येथील व्यावसायिकाच्या हत्येत सहभागी आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने बोरिवली येथून अटक के ली. राजेंद्र रावत ऊर्फ राजू नेपाळी असे या आरोपीचे नाव असून तो संघटित गुन्हेगारी टोळीतील सक्रि य गुंड युसूफ बचकाना याचा साथीदार आहे.

कर्नाटकच्या हुबळी शहरात ६ ऑगस्टला व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. ही हत्या म्हैसूर कारागृहात जन्मठेप भोगणाऱ्या युसूफने घडवून आणल्याचे हुबळी पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले. मृत व्यावसायिकाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याची आणि युसूफची ओळख नाशिक कारागृहात झाली होती. कारागृहातून बाहेर पडल्यावर व्यावसायिकाने जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू के ला. वादात सापडलेले भूखंड विकत घेऊन त्याची पुन्हा विक्री करण्यात या व्यावसायिकाचा हातखंडा होता. अशाच एका व्यवहारातून त्याला दोन कोटींचा फायदा झाला. त्यातील निम्मी रक्कम युसूफ मागत होता. ती न दिल्याने युसूफने कर्नाटक आणि मुंबईतील साथीदारांकरवी व्यावसायिकाची हत्या घडवून आणली. या प्रकरणी हुबळी पोलिसांनी सात आरोपींना अटक के ली. ते राजू नेपाळीचा शोध घेत होते.

मुंबई गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिवलकर, निरीक्षक सचिन गवस, सहायक निरीक्षक प्रशांत सावंत, अतुल आव्हाड, उपनिरीक्षक हेमंत गीते यांनी नेपाळीबाबतची माहिती मिळवली. बोरिवली येथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. नेपाळीने व्यावसायिकाच्या हत्येसाठी चार गुंड मुंबईहून हुबळीला पाठवले होते. त्या बदल्यात युसूफने नेपाळीला दोन लाख रुपये आगाऊ दिले होते. तर हत्येनंतर १० लाख रुपये देणार होता.