विदेशातून आणलेल्या लाखो रुपये किमतीच्या सामानासाठी विविध कर भरण्याचे सांगून नामांकित बँकेच्या मॅनेजर पदावर असलेल्या तरुणीची फसवणूक करून ३ लाख ७५ हजाराचा गंडा घातल्याचे प्रकरण प्रकाशझोतात आले आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी दिल्लीतून भामट्याला अटक केली आहे पण त्याच्या सहकारी तरुणीचा पवई पोलीस शोध घेत आहेत. अटक आरोपी भामटा बंटी सत्येंद्र प्रताप सोवरण सिंह उर्फ मॅनसन रॉड्रीक्स (३३) याला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

फिर्यादी  तरुणी ही वांद्रे येथील माउंटमेरी रोडवरील उच्चभ्रू इमारतीत रहाते. ती चांदवली येथील एका नामांकित बँकेत सहाय्यक मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तरुणीचे फेसबुकवर अकाउंट आहे. ऑक्टोबर,२०१८ मध्ये आरोपी सत्येंद्र प्रताप सोवरण सिंह उर्फ मॅनसन रॉड्रीक्स याने सोशल मीडियावर फिर्यादी तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याचं प्रोफाइल पाहून फिर्यादीने ती रिक्वेस्ट स्वीकारली. अनेक दिवस फिर्यादी आणि आरोपी दोघे फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर मॅनसॅन रॉड्रिक्स याने फिर्यादीला तो इटली देशाचा नागरिक आहे. सध्या तो लंडन येथील मारिन इंजिनियर कंपनीत कामाला आहे. असे सांगून फिर्यादी तरुणीचा विश्वास संपादन केला. त्याने तरुणीशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला. फेसबुकवर रॉड्रिक्स म्हणाला त्याचे जहाज फिनलॅंड देशात असून त्याचा सहकारी मार्केटिंगसाठी गेला आहे, त्याच्यासोबत आपणही जात आहे. तुझ्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करणार आहे. त्या वस्तू तुला काही दिवसात मिळतील. काही दिवसांनी दिल्लीतील कस्टम अधिकारी नेहा मायुर  यांचा फोन फिर्यादीला आला. अन् तिने तुमच्या नावाने विदेशातून महागड्या वस्तू. सोन्याचे दागिने, घडयाळ अशा वस्तूसह चलन आले आहे. तुम्हाला कर भरावा लागेल अशी बतावणी करून विविध बँकेत टॅक्सची रक्कम भरण्यास सांगितले. फिर्यादीने सुरुवातीला ५१ हजार रुपये त्यानंतर एका आठवड्यात फिर्यादीने विविध बँकेत ३ लाख ७१ हजाराची रक्कम भरली. मात्र तिला विदेशातून आलेले पार्सल मिळाले नाही.

आपली फसवणूक केल्याचे फिर्यादी तरुणीच्या लक्षात येताच तिने घडलेला प्रकार पवई पोलीस ठाण्यात सांगितला. पवई पोलीस ठाण्यात फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी सत्येंद्र प्रताप सोवरण सिंह उर्फ मॅनसन रॉड्रीक्स आणि तोतया कस्टम अधिकारी नेहा मायुर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घटनेत पवई पोलिसांनी तांत्रिक गोष्टींचा अवलंब करून दिल्लीतून रॉड्रिक्स याला अटक केली. तर नेहा मायूर मात्र फरारीच असून पवई पोलीस तिचा शोध घेत आहे. रॉड्रिक्स याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून पवई पोलीस अधिक तपस करीत आहेत.