पाच जणांना अटक; दोन महिलांचा शोध
सोने घेऊन जाणाऱ्या एका कुरियर कंपनीला लुटण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांचा सतर्कतेमुळे फसला. विशेष म्हणजे या टोळीत दोन महिलांचा सहभाग होता आणि त्या विक्रीकर विभागाच्या अधिकारी बनून आल्या होत्या. अशा पद्धतीने सोने लुटण्याच्या टोळीत प्रथमच महिलांचा सहभाग दिसून आला आहे.
काळबादेवी येथील एक कुरियर कंपनी सराफांचे सोन्याचे दागिने देशभरात वितरीत करते. २८ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे कंपनीचे कर्मचारी मारुती स्विफ्ट गाडीतून ४० लाख रुपये सोन्याचे दागिने दिल्ली येथे पोहोचविण्यासाठी विमानतळावर निघाले होते. रात्री सव्वाअकराच्या सुमारास विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वाराजवळून आलेल्या एका इनोव्हा गाडीने कुरियर कंपनीच्या मारुती गाडीला ओव्हरटेक करून थांबवले. या इनोव्हा गाडीतून दोन महिलांसह पाच जण उतरले. विक्रीकर अधिकारी असल्याचे सांगून सामानाची मागणी करू लागले. परंतु कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने पटकन गाडीच्या काचा लावून गाडी आतून बंद केली. त्यावेळी या टोळीतील अन्य आरोपी दुसऱ्या गाडीतून आले. त्यांनी गाडीला घेराव घालून गाडीच्या काचा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगावधान दाखवत या कर्मचाऱ्याने फोन करून पोलिसांना मदतीला बोलावले. पोलीस आल्याचे पाहून सर्व आरोपींनी पळ काढला.
याप्रकरणी आम्ही पाच जणांना अटक केली असून, त्या दोन महिलांचा शोध सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुखेडकर यांनी दिली.