बोगस कॉल सेंटर सुरु करुन मुंबईतील ८० लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या त्रिकुटाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील एटीएमबाहेर आरोपीसाठी पोलिसांनी सापळा रचला होता. अखेर आठव्या दिवशी एक आरोपी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मुंबईत राहणारा सुरज मुके (वय ३०) हा तरुण पीएचडी करतो. काही दिवसांपूर्वी त्याला एका बँकेतून फोन आला होता. कर्ज देतो असे सांगून फोनवरील व्यक्तीने सुरजकडून बँकेच्या डिटेल्स आणि कागदपत्र मागवून घेतले. cityfinance@gmail.com या ईमेल आयडीवर त्याने डिटेल्स पाठवायला सांगितले होते. याशिवाय प्रोसेसिंग शुल्क, डॉक्यूमेंटेशन शुल्क, ८ टक्के जीएसटी आणि काही पैसे असे एकूण ९१ हजार ५०० रुपये त्याच्याकडून उकळण्यात आले होते. फसणूक झाल्याचे लक्षात येताच सुरजने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी चार मोबाइल क्रमांकाचा आणि एका बँक खाते क्रमांकाचा शोध घेतला. ते बँक खाते गाझियाबादमधील वसुंधरा भागातील असल्याचे समोर आले. यानंतर माटुंगा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मारुती शेळके आणि त्यांचे पथक गाझियाबादला पोहोचले. आठ दिवस पोलिसांचे पथक एटीएम केंद्रावर नजर ठेवून होते. अखेर आरोपी शमाकांत शर्मा हा एटीएममध्ये पैसे काढायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. चौकशीत त्याने अन्य दोन आरोपींची नावे सांगितले. या आधारे पोलिसांनी विवेक शर्मा (वय २६) आणि आशूकुमार सिंह (वय २४) याला देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून १७ मोबाइल फोन, एक लॅपटॉप, २२ डेबिट कार्ड, २ हार्डडिस्क जप्त केल्या आहेत. या सर्वांनी बोगस कॉल सेंटर सुरु करुन लोकांना गंडा घातला होता.