जयेश शिरसाट

एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन गंडा घालणारे दोन तासांच्या आत त्या व्यक्तीच्या खात्यातील पैसे लंपास करतात. सुप्रिया यांचे पैसे २० डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यातून वळते झाले. पण या व्यवहारांचे तपशील उघड होऊन आरोपींपर्यंत पोहोचण्यास सात महिने लागले.

सायबर भामटेगिरी नवी नाही. क्रेडिट-डेबिट कार्डाचे तपशील घेऊन परस्पर बँक खात्यातले पैसे इतरत्र फिरवून फसवणूक करायची, ही सायबर भामटेगिरी नवी नाही. पण अशा गुन्ह्य़ांच्या मुळापर्यंत पोहोचत नेमक्या आरोपींना बेडय़ा ठोकण्याचं कसब पोलिसांना जमतंच असं नाही. विविध अडीअडचणींमुळे असे गुन्हे वर्षांनुवर्ष तपासावरच राहतात. अलीकडेच लोहमार्ग पोलीस दलाच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) झारखंडच्या एका खेडेगावातून आरोपींना अटक केली. याच परिसरातून देशभर पसरलेल्या सायबर गुन्हेगारीचा आवाका, गुन्ह्य़ांची पद्धत, संघटित टोळ्या आणि अशा थक्ककरणाऱ्या अनेक गोष्टी एसटीएफला समजल्या. भामटय़ांचा दोन तासांचा खेळ उलगडण्यासाठी मात्र एसटीएफला सात महिने प्रतीक्षा करावी लागली.

काळबादेवी येथे राहणाऱ्या सुप्रिया रावल (२४) २० डिसेंबरच्या संध्याकाळी लोकलने प्रवास करत होत्या. लोकलने कांदिवली स्थानक सोडल्यानंतर त्यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने कोटक महिंद्रा बँकेतून बोलतोय, असे सांगत सुप्रिया यांचा पॅन, आधार क्रमांक सांगितला. तुमचे डेबिट कार्ड बंद होणार आहे. सेवा सुरू ठेवण्यासाठी कार्डचे तपशील द्यावे लागतील, असे बजावले. सुप्रिया यांनी तपशील दिले. मागोमाग आलेले सहा ओटीपी क्रमांकही सांगितले. पुढल्या काही सेकंदांत त्यांच्या खात्यावरून परस्पर सहा ऑनलाइन व्यवहार घडले आणि खात्यातील ५५ हजार रुपयांची रक्कम वळती झाली. अचानक घडलेल्या या घटनेने भांबावलेल्या सुप्रिया यांनी बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

तत्कालीन पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या प्रकरणाचा तपास एसटीएफकडे सोपवला. खरं तर लोहमार्ग पोलीस दलातील एसटीएफ हे महत्त्वाचा विभाग. पण अत्यंत गुंतागुंतीचा तांत्रिक तपास मागणारी आणि संयम ठेवायला भाग पाडणारी एसटीएफकडे आलेली ही पहिलीच केस. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे आणि त्यांचे पथक या तपासासाठी सज्ज झाले. प्रथम मुंबईच्या सायबर पोलीस ठाण्याशी चर्चा करून तपासाची दिशा आणि महत्त्वाचे टप्पे आखून घेण्यात आले. ज्या मोबाइल क्रमांकावरून सुप्रिया यांना आलेला फोन हा झारखंडचा होता हे काही तासांत स्पष्ट झाले. पण फक्त लोकेशनवरून संशयित आरोपी हाती लागेलच याची खात्री नव्हती. म्हणून पोलीस निरीक्षक शहाजी निकम, उपनिरीक्षक चंद्रकांत रासम, सहायक उपनिरीक्षक सतीश क्षीरसागर, हवालदार बाबा चव्हाण, पोलीस नाईक प्रवीण घार्गे, सुयेश यल्ला, सतीश फडके आणि पथकाने सुप्रिया यांच्या खात्यातील ५५ हजार रुपये कुठे गेले? याचा तपास सुरू केला.

या तपासातून जे पुढे आलं ते थक्क करणारं होतं. इंग्रजी दैनिकात कार्यरत महिला पत्रकार आणि मालवणीत राहणाऱ्या तरुणाच्या नावे ‘एम पैसा’ अ‍ॅपवर ईवॉलेट तयार करण्यात आले होते. त्या वॉलेटमध्ये सुप्रिया यांच्या खात्यातून २० हजार रुपये वळवण्यात आले तर उर्वरित रक्कम एअरटेल मनी अ‍ॅपवरील खात्यांत वळवण्यात आल्याची माहिती पथकाला मिळाली. मात्र त्यासाठी पथकाला सात महिने वाट पाहावी लागली. यापैकी एम पैसा अ‍ॅपवरील व्यवहारांचे तपशील पथकाला मिळाले. मात्र एअरटेल मनी अ‍ॅपवरील व्यवहारांच्या तपशिलांची अद्याप पथकाला प्रतीक्षा आहे. एम पैसा अ‍ॅपवरील वॉलेटमधून नवी मुंबईतील कळंबोली आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या अनेकांची वीज बिलं, मोबाइल बिलांचा भरणा झाला होता. पथकाने या दोघांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना ई वॉलेट खात्याची माहिती मिळाली. तोवर त्यांना त्यांच्या नावाचा, तपशिलांचा वापर करून वॉलेट तयार झाल्याबद्दल ठाऊक नव्हते.

ही वॉलेट मोबाइलवरून हाताळण्यात आली होती. मोबाइल क्रमांक बंद होता पण जून महिन्यात तो मोबाइल (हॅण्डसेट) ग्रॅण्टरोड परिसरात सुरू असल्याचे पथकाला समजले. पथकाने हा मोबाइल वापरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. हा मोबाइल आपला साडू नरेश बिहारी मातोप्रसाद याचा आहे. डिस्प्ले बिघडल्याने नरेशने मोबाइल दुरुस्त करण्यासाठी दिला होता. दुरुस्त झाल्यानंतर तो मी वापरतोय, हे त्या व्यक्तीने कबूल केले. नरेश झारखंडचा, कळंबोलीत राहणारा असल्याने समीकरण जुळत होतं. पथकाने जराही वेळ न दवडता कळंबोली गाठून पानटपरी चालवणाऱ्या नरेशची गचांडी आवळली आणि तो पोपटासारखा बोलू लागला.

झारखंडच्या जामतारा आणि आसपासच्या गावांमध्ये सायबर भामटय़ांच्या संघटित टोळ्या कार्यरत आहेत. टोळीप्रमुख देशातल्या प्रमुख शहरांमधल्या व्यक्तींचे तपशील मिळवून टोळीला पुरवतो. टोळीतल्या सदस्यांनी दिवसभरात ४०० ते ५०० जणांना संपर्क साधून गळाला लावण्याचा प्रयत्न करायचा. गळाला लागणं म्हणजे डेबिट-क्रेडिट कार्डचे तपशिलांसह ओटीपी मिळवणं. ओटीपी आधारे टोळीप्रमुख झारखंडमध्ये बसून त्या व्यक्तीच्या खात्यातील पैसे पुढल्या काही सेकंदांत परस्पर वळवणार. महोम्मद शहाबाज युसूफ अन्सारी या टोळीप्रमुखासाठी नरेश एजंट म्हणून कळंबोलीत काम करत होता.

सुप्रिया यांच्या खात्यातून एम पैसा वॉलेटमध्ये जमा झालेल्या पैशांआधारे नरेशने कळंबोलीतील अनेक व्यक्तींची बिलं भरली. ती भरता यावीत यासाठी वीजपुरवठा कंपन्यांसह मोबाइल गॅलरीमधील कर्मचाऱ्यांना नरेशने बांधलं होतं. बिल भरण्यासाठी गॅलरीत आलेल्या ग्राहकांकडून रोख रक्कम कर्मचारी घेत, पण त्या ग्राहकांचे बिल नरेश फसवणुकीने वॉलेटमध्ये घेतलेल्या रक्कमेतून ऑनलाइन करे. गॅलरीत जमा झालेली रोख रक्कम तिथले कर्मचारी १० टक्के कमिशन कापून नरेशला देत. नरेशही स्वत:चे १० टक्के कमिशन कापून उर्वरित रक्कम झारखंडमधील टोळीने सुचवलेल्या खात्यांवर जमा करे. झारखंडमधील हे खातेधारक तीन ते पाच टक्के कापून उरलेली रक्कम टोळीप्रमुखाला पोहोचती करत. एसटीएफ पथकाने नरेशच्या चौकशीतून प्रभु कृष्णा मंडल आणि क्रिष्णा राजेश मंडल या दोन सबएजंटांना देवधर जिल्हय़ातून अटक केली.

देवधर जिल्हय़ाच्या सायबर विभागाच्या उपअधीक्षक नेहा बाला यांनी एसटीएफ पथकाला सर्वतोपरी सहकार्य केले. पथकाने टोळीप्रमुख शहाबाजच्या घरावर छापा घातला. मात्र वृद्ध आई-वडील, पत्नी आणि मुलांखेरीज घरात कोणीही नव्हते. शहाबाजचे घर आलिशान आहे. घराभोवती दहा ते बारा फुटी भक्कम भिंत आणि त्यावर पाच ते सहा इंच बाहेर आलेले लोखंडी खिळे, अशी व्यवस्था होती. बाहेरील सर्व हालचाली दिसाव्यात या उद्देशाने केलेली सीसीटीव्ही व्यवस्था. पोलीस आत आलेच तर निसटण्यासाठी चोर दरवाजेही.. हा दिमाख ऑनलाइन गंडा घालून कमावलेल्या पैशांवर. आता एसटीएफने शहाबाजला अटक करणारच असा पण केलाय. त्या इराद्याने पथकाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.