सलीम-जावेद या जोडीने सिनेरसिकांचा एक काळ गाजवला हे आपल्याला ठाऊक आहे. सलीम खान म्हणजे अभिनेता सलमान खानचे वडील. सलमान  खानच्या वडिलांना अर्थात सलीम खान यांना फोनवरून ठार मारण्याची धमकी आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गुंड शाहरुख गुलाबनबी उर्फ शेरा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मी छोटा शकीलचा माणूस आहे सलमान खानचा नंबर द्या नाहीतर ठार करेन अशी धमकी शाहरुख उर्फ शेराने दिली होती. त्याला अटक करण्यात आली असून कोर्टात हजर करण्यात आले. २२ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हिंदी सिनेमाचे लेखक म्हणून सलीम खान प्रसिद्ध आहेत. सलमान खानचा नंबर मागण्यासाठी शेरा या गुंडाने त्यांना मोबाइलवर फोन केला. पर्सनल नंबर असल्याने आणि सलमानच्या जिवाला धोका असल्याने सलीम खान यांनी नंबर देण्यास नकार दिला. पहिला फोन १३ नोव्हेंबरला आला होता. मात्र सुरुवातीला सलीम खान यांनी या फोनकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर १५ नोव्हेंबरला शेरा या गुंडाने पुन्हा एकदा सलीम खान यांना फोन केला आणि सलमान खानचा नंबर दिला नाही तर ठार करण्याची धमकी दिली. तसेच आपण छोटा शकीलचा हस्तक असल्याचेही सांगितले. सलीम खान यांनी त्यावेळीही दखल घेतली नाही. मात्र शेरा हा गुंड वारंवार फोन करत होता. फोनच्या कॉलर आयडीवर डीजीपी असे लिहिले होते. यासंदर्भात सलीम खान यांनी सलमानचा बॉडीगार्ड शेरा यालाही संदर्भात सांगितले. त्यावेळी शेरा या सलमानच्या बॉडीगार्डने त्यालाही फोन येत असल्याचे सलीम खान यांना सांगितले.

यानंतर सलीम खान यांनी त्यांचा मॅनेजर विकास हेमेंद्रकुमार छाया यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन तक्रार केली. मोबाईल नंबरवरून माहिती काढल्यानंतर शेरा नावाच्या माणसाचा हा मोबाइल असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मोबाइल क्रमांकाचा माग काढून शेरा उर्फ शाहरुख नबीला अटक केली. उत्तर प्रदेशात शेरा या गुंडावर हत्येचा प्रयत्न, खंडणी, प्राणघातक हत्यारं वापरणं असे साठहून अधिक गुन्हे दाखल आहे. त्याचा टायर विक्रीचा व्यवसाय आहे. शेरा या गुंडाने सलीम खान यांना दहापेक्षा जास्त वेळा फोन केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.