२५ जूनपर्यंत पोलीस कोठडी; अनेक तरुणींना फसवल्याचा संशय

मुंबई : समाजमाध्यमांवर सुरू झालेला संवाद, त्यातून निर्माण झालेली प्रेमभावना आणि त्यानंतर तरुणाशी झालेली पहिलीच भेट पश्चिम उपनगरातील तरूणीचा घात करून गेली. तरूणाने तिला नालासोपारा येथे नेऊन बलात्कार केला. आदित्य गुप्ता (२०) असे या तरूणाचे नाव असून, गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाने त्याला अटक केली. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअ‍ॅलिटी शोचा तो स्पर्धक होता.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आदित्यने याच पद्धतीने आणखी अनेक तरुणींची फसवणूक केल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस या माहितीची खातरजमा करत आहेत. गेल्या वर्षी आदित्यने या रिअ‍ॅलिटी शोमध्ये द्वितीय स्थान पटकावले होते. त्यानंतर त्याला वलय प्राप्त झाले आणि तरुणींमध्ये तो लोकप्रियही ठरला. इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे दोन हजार चाहते (फॉलोअर्स) आहेत. त्यात तरुणींची संख्या मोठी आहे. याच लोकप्रियतेचा फायदा घेत त्याने तरुणींची मानसिक, शारीरिक फसवणूक केली असावी, असा संशय पोलीस व्यक्त करतात.

या प्रकरणातील तरुणी १७ वर्षांची असून पश्चिम उपनगरातील महाविद्यालयात शिकते. तीन महिन्यांपासून आदित्य आणि ती इन्स्टाग्रामवर संवाद साधत होते. आदित्यने या तरुणीला अश्लिल चित्रफितीही पाठवल्या होत्या. रविवारी दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. ही त्यांची पहिलीच भेट होती. भेटल्यानंतर आदित्यने या तरुणीला नालासोपारा येथील घरी आणले. तेथे तिला गांजा ओढण्यास जबरदस्ती केली. तरुणीने गांजाचे सेवन केले. नशेत असताना आदित्यने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. पुढे त्याच अवस्थेत तिला अंधेरी स्थानकाजवळ सोडून त्याने पळ काढला.

रविवारी रात्री मुलगी घरी आली नाही म्हणून पालकांनी डी. एन. नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान, गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाचे प्रभारी निरीक्षक महेश देसाई, उपनिरीक्षक वाल्मिक कोरे, पेडणेकर, नाईक, सावंत, जाधव या पथकाने समांतर तपास सुरू केला. सोमवारी दुपारी ही तरुणी अंधेरी स्थानकाजवळ अर्धवट शुद्धीत असल्याची माहिती मिळताच पथकाने तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्याकडे जुजबी चौकशी करून आदित्यची माहिती काढली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आदित्यला ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले गेले. आदित्यने या तरुणीला अंधेरीला सोडण्याआधी तिच्या मोबाइलमधील सीमकार्ड काढून फेकून दिल्याचेही स्पष्ट झाले.

न्यायालयाने आरोपीला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. वैद्यकीय चाचणीसह प्राथमिक चौकशीतून पुढे आलेल्या सर्व माहितीची खातरजमा केली जाईल. त्यानुसार पुढील कारवाई होईल.

-परमेश्वर गणमे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक