स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन थेट बलात्काराची धमकी देणाऱ्या इम्तियाज शेख या तरुणाला यापूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणी आता अन्य दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. अशरफ शेख आणि विराट शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तसंच दोघंही विरार येथील रहिवासी असून रिक्षाचालक असल्याची माहितीही समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.

“सध्या युट्यूबवर हिंदुस्तानी भाऊ हा प्रसिद्ध आहे. त्याच्या शैलीप्रमाणेच या तिन्ही आरोपींनी अल्पावधित लोकप्रिय होण्यासाठी त्यांनी अग्रिमा जॉशुआवर व्हिडीओ तयार केला होता,” अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, त्या तिघांचेही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतक पोलिसांनी उमेश दादा यासा १२ जुलै रोजी बडोद्यातून अटक अग्रिमा जोशुआला धमकावल्या प्रकरणी अटक केली.
“उमेश दादाला अटक झाल्यानंतर अन्य दोन आरोपींनी आपले मोबाईल बंद केले आणि लपून बसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. अखेर १५ दिवसांना त्या दोघांना विरारमधून अटक करण्यात आली,” अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये दोन्ही आरोपी आपल्या कृत्याबद्दल माफी मागताना दिसत आहेत.

यापूर्वी उमेश दादाला अटक

इम्तियाज शेख सोशल मिडियावर उमेश दादा या नावाने अकाउंट चालवतो. याच अकाउंटवरुन त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रमाणी जोशुआबद्दल अपशब्द वापरत, अश्लील भाषेत तिला बलात्काराची धमकी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी स्वत:हून तक्रार नोंदवून घेत शेखला ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांच्या अधिकृत अकाउंटवरुन शेखच्या अटकेसंदर्भातील माहिती देण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

एका स्टँडअप व्हिडीओमध्ये कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, यानंतर अग्रिमा जोशुआनं व्हिडीओद्वारे माफी मागितली होती. मात्र त्यानंतर प्रकरणाने एक नवं वळणं घेतलं. जोशुआला विरोध करताना काही व्हिडीओ कंटेंट क्रिएट करणाऱ्यांनी व्हिडीओ पोस्ट करुन जोशुआला थेट बलात्कार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात अभिनेत्री स्वरा भास्करनेही आक्षेप नोंदवत असे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करा असं म्हटलं होतं.