भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. गटारात पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी किरीट सोमय्या घाटकोपरमध्ये आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाचीदेखील झाली. पोलिसांनी आपल्याला तसंच महिलेचा पती आणि इतरांना अटक करण्यात आली असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली. महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या करत होते.

याआधी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दुपारी १२ वाजता घाटकोपरमध्ये चिराग नगर पोलीस स्टेशनबाहेर महिलेच्या कुटुंबासोबत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी १२ दिवसांनंतर अद्यापही एफआयआर दाखल केला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला होता. महिलेच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मृत्यूला १३ दिवस झाले तरी FIR का नोंदविली गेला नाही? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

“पोलीस एफआयआर दाखल करण्यास नकार देत असून ३३ मुद्यांची यादी तयार केली आहे. तपासासाठी कित्येक आठवडे लागतील,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं असून पालिका कंत्राटदार माफियांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? अशी विचारणाही केली आहे.

काय आहे प्रकरण
घाटकोपरमधील असल्फा गावात राहणाऱ्या शीतल (३२) गिरणीवर पीठ आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. पण एक तास होऊन गेला तरी त्या न परतल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरू केल असता पिठासाठी नेलेली पिशवी कुटुंबाला. त्याजवळच बंदिस्त नाला होता आणि त्यावरील काँक्रीटचे झाकण उचकटले होते. त्याच सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने शीतल नाल्यात पडल्या आणि मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. हाजीअलीजवळ त्यांचा मृतदेह आढळला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

असल्फा येथील छोटय़ा नाल्यात पडल्यानंतर मानवी मृतदेह वरळी-हाजीअलीपर्यंत वाहून येऊच शकत नाही, असे निरीक्षण महापालिका अधिकाऱ्यांनी नोंदवल्यानंतर शीतल यांच्यावर नेमका काय प्रसंग बेतला, त्यांचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट करणे पोलिसांसाठीही आव्हान ठरत आहे.