पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट कागदपत्रं तसंच फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी परांजपे बंधूना मुंबईतून पुण्यात नेलं. दरम्यान ही अटक नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

पोलीस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “कलम ४०६, ४२०, ४६४, ४६७ आणि ४६८ अंतर्गत विले पार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ७० वर्षीय महिलेने श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे तसंच आर पाटील नावच्या एका व्यक्तीविरोधात व्यवसायात फसवणूक केल्याची तसंच बनावट दस्तऐवज वापरल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली”.

“महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी परांजपे बंधूंना पुण्यातून मुंबईला आणलं. चौकशी सुरु असून अटक केली असं म्हणू शकत नाही,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“तक्रारदार महिलेने तक्रारीत महागेव परांजपे आणि रघुवेंद पाठक यांचाही उल्लेख केला आहे. याआधी जानेवारी २०२० मध्येही त्यांच्याविरोधात अशीच एक फसवणूक आणि बनावट दस्तऐवज वापरल्याची तक्रार करण्यात आली होती. त्याप्रकरणीदेखील तपास सुरु आहे,” अशी माहिती पोलीस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी दिली आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्राथमिक तपास सुरु असून सध्या दोन्ही बंधूंना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. दोन्ही बंधूंवर बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.