अनेक वर्षांतली पहिलीच कठोर कारवाई

जयेश शिरसाट, मुंबई</strong>

अरबी समुद्रात थांबलेल्या देशी-विदेशी मालवाहू बोटींमधील डिझेल चोरून विकणाऱ्या राजकिशोर दास उर्फ राजू पंडित आणि त्याच्या संघटीत टोळीविरोधात येलो गेट पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. अनेक वर्षे संघटीतरित्या समुद्रातून डिझेल तस्करी सुरू आहे. मात्र तेल माफीयांविरोधात मोक्कान्वये करण्यात आलेली ही पहिलीच कठोर कारवाई मानली जात आहे.

पूर्वी महोम्मद अली आणि चांद मदार तेल तस्करीत सक्रिय होते. चांदची हत्या झाली. महोम्मदअली व त्याच्या टोळीनेही तेल तस्करीतून माघार घेतल्यानंतर कुलाबा ते मोरा दरम्यान पंडीत हा नवा माफिया म्हणून उदयास आला. परदेशी मालवाहू बोटी मुंबई बंदरात येण्याआधी समुद्रात काही दिवस थांबतात. बोटीवरील कप्तान, व्यवस्थापकांना हाताशी धरून बोटीतील अतिरिक्त इंधन साठा विशेषत: हायस्पीड डिझेल पंडितची टोळी अत्यंत कमी किमतीत विकत घेते. चोरलेले तेल चोरकप्पे असलेल्या विशेष बोटीतून किनाऱ्यावर आणले जाते, असे सांगितले जाते.

पंडित परदेशी बोटींवरील डिझेल १५ ते २५ प्रति लिटर या भावाने विकत घेतो आणि मुंबई, ठाण, नवीमुंबई, रायगड परिसरात ४५ ते ६० रुपयांना विकतो. गेल्या २० वर्षांपासून सक्रिय असलेल्या पंडितविरोधात केवळ पाच गुन्हे नोंद आहेत. यापैकी दोन गुन्हे वर्षभरातील आहेत. अरबी समुद्रातून चोरलेले डिझेल त्याची टोळी नवी मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवते, साठवते आणि तेथूनच राज्याच्या विविध भागांमध्ये पाठवते, असे कळते.

१७ ऑक्टोबरला मध्यरात्री सागरी पोलिसांच्या गस्त नौकेने खोल समुद्रात निर्मनुष्य (पान ३वर)

अल्पवयीन मुलांचा सहभाग

पंडित डिझेल किनाऱ्यावर आणण्यासाठी कुलाबा, कफ परेड येथील अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याचे आणि प्रत्येक फेरीसाठी नव्या तरूणाची निवड केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

राजकीय पक्षात प्रवेश

पंडीतने अलीकडेच राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. तो राजकीय आश्रयाआड तस्करी करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. याशिवाय त्याने नवी मुंबईत बाटलीबंद पाण्याचा कारखाना सुरू केला असून मुंबईसह नवी मुंबई आणि रायगडमध्ये त्याने बरीच मालमत्ता विकत घेतल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्याची खातरजमा पोलीस करत आहेत.