मुंबई : नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या मुलींकरवी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ग्राहकांशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधून हे रॅकेट चालविले जात होते. याप्रकरणी गुन्हे शाखेने दलाल जतून यादव (३७) याला अटक केली आहे. तर २१ वर्षीय आणि ३० वर्षीय बंगाली तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. वर्षभरापूर्वी या तरुणी कामाच्या शोधात मुंबईत आल्या होत्या. काम देण्याच्या बहाण्याने आरोपीने त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

यादव इंटरनेटवरील मसाज रिपब्लिक डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवितो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संकेतस्थळावरील यादव याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी यादवने विविध परदेशी आणि भारतीय तरुणींचे फोटो या बनावट ग्राहकाच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविले. त्यानुसार या ग्राहकाने त्यातील दोन मुलींची मागणी यादवकडे केली. त्याने साकीनाका परिसरातील हॉटेल स्कायवे येथे या ग्राहकाला येण्यास सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. आरोपी मुलींसह तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून रशियन आणि युक्रेनमधील मुलींना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले जात असल्याचेही पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुख्य सूत्रधार फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.