मुंबई पोलिसांनी तस्करीप्रकरणी तब्बल २३ वर्षे फरार राहिलेल्या एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. हरिश कल्याणदास भावसार उर्फ परेश झवेरी याने करचुकवेगिरी करत सोने व हिऱ्यांची तस्करी केली होती. याप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा होता. हे प्रकरण १९९७ मधील आहे. जेव्हा झवेरी व त्याच्या भावाने १३० कोटींचा कर टाळला होता.

द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार परेश झवेरी सिंगापूरहून कच्चे सोने आणि हिरे आयात करत होता. मात्र त्यावरील कर टाळत असत. यामुळे अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) चौकशी सुरू करण्यास सांगण्यात आले व या व्यक्तीस ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले, मात्र तोपर्यंत तो निसटला होता.

अखेर इतके वर्षे शोध घेत असलेल्या मुंबई पोलिसांनी त्याला तब्बल २३ वर्षानंतर अटक केली. पोलिसांनी झवेरीच्या भावाची संपत्ती देखील जप्त केली आहे. ईडीने १९९७ मध्ये सोने व हिऱ्यांच्या तस्करी प्रकरणी ‘कोफपोसा'(कन्झर्वेशन ऑफ फॉरेन एक्सजेंच अॅण्ड प्रिव्हेंशन ऑफ स्मगलिंग अॅक्टिव्हिटी ) अधिनियामअंतर्गत अटकेचा आदेश दिला होता.