सत्यपाल सिंह यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन सात दिवस उलटले तरी नवीन आयुक्तांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. आता तर हा मुद्दा उच्च न्यायालयात पोहचला आहे. आठवडाभरापासून रिक्त असलेले आयुक्तपद भरण्याऐवजी जात-धर्माच्या आधारे त्याबाबत राजकारण खेळले जात आहे. परिणामी पोलीस आयुक्तांअभावी पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होत असल्याचा दावा करीत आयुक्तपदासाठी पात्र उमेदवारांची यादी मागविण्याचे आणि तातडीने नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
केतन तिरोडकर यांनी जनहित याचिकेद्वारे हा मुद्दा उपस्थित केला असून न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर त्यांनी ही याचिका सादर केली. न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी ठेवली आहे.
सिंह यांनी राजीनामा देऊन आठवडा उलटत आला तरी अद्याप नव्या आयुक्तांची घोषणा झालेली नाही. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात आयुक्तपदाच्या नावावरून मतभेद आहेत. शिवाय अल्पसंख्यांक समाजाच्या अधिकाऱ्याला या पदी नियुक्ती करण्यावरून दोघांमध्ये जुंपली असून परिणामी ही नियुक्ती लांबणीवर पडली आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. राजकीय हेतूने ही नियुक्ती झाल्यास जनतेला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असाही आरोप याचिकेत केला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकींचा अहवाल, पात्र उमेदवारांची यादी व त्या पाश्र्वभूमीवर तातडीने आयुक्तपदाच्या नियुक्ती जाहीर करण्याचे आदेश राज्य  सरकारला देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.