उमाकांत देशपांडे, मुंबई

मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपत असल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यात राष्ट्पती राजवट लागू असल्याने मुदतवाढ देण्यात येणार असून राज्यपालांकडून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरु असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले.

संजय बर्वे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी २८ फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली होती. ते ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते. पण त्यांना विधानसभा निवडणुका व अन्य कारणास्तव तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठविला व त्यास मान्यता देण्यात आली होती. ही मुदतवाढ आता ३० नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. मुंबई पोलिस आयुक्तांसारख्या महत्वाच्या पदावर सेवाज्येष्ठता आणि अन्य निकषांनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवाज्येष्ठनेनुसार तीन ते पाच अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस गृहखात्याकडून केली जाते व एकाची निवड मुख्यमंत्र्यांकडून केली जाते. राष्ट्रपती राजवटीत ही प्रक्रिया करुन राज्यपालांना नवीन अधिकाऱ्याची निवड करावी लागणार आहे आणि त्यानंतर ज्या अधिकाऱ्याची नियुक्ती होईल, त्यापदावरही अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल. या नियुक्त्यांमुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या-बढत्या कराव्या लागतील. हे टाळण्यासाठी सध्या राष्ट्पती राजवटीचे कारण देत मुंबई पोलिस आयुक्त हे अतिशय महत्वाचे पद असल्याने आणि राजधानीच्या शहरात कायदा व सुव्यवस्था टिकविणे जोखमीचे काम असल्याने बर्वे यांना पुन्हा तीन महिने मुदतवाढीचा विचार करण्यात येत आहे.