सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर सीबीआय टीमचं पथक मुंबईत दाखल झालं आहे. दरम्यान सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. भेट घेण्यासाठी ते मंत्रालयात पोहोचले होते. भेटीनंतर एएनआयशी बोलताना त्यांनी सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती दिली.

अनिल देशमुख यांची भेट घेतल्यानंतर परमबीर सिंह यांना सीबीआयला सहकार्य करणार का ? असं विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना परमबीर सिंग यांनी हो नक्कीच करणार असं उत्तर दिलं.

याआधी बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर परमबीर सिंग यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु. त्यानंतर पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं.

सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह इतरांविरुद्ध पाटणा येथे नोंदवण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि त्याचा तपास सीबीआयला हस्तांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मंजुरी दिली. मुक्त, सक्षम आणि निष्पक्ष तपास ही काळाची गरज असल्याचे नमूद करतानाच, हा तपास सीबीआयला सोपवण्यास मान्यता देण्यासाठी बिहार सरकार पात्र आहे, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.

बिहार पोलिसांनी सुशांतच्या मृत्युबाबत नोंदवलेला ‘एफआयआर’ योग्य आहे. सुशांत राजपूतच्या मृत्यूच्या संदर्भात आणखी एखादे प्रकरण दाखल करण्यात आले, तर सीबीआयच त्याचा तपास करेल असं न्यायालयाने सांगितलं आहे. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या मुंबई पोलिसांची कार्यकक्षा मर्यादित आहे असंही न्यायालयाने म्हटलं होतं.