सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर आज महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

 

दरम्यान, या अधिकाऱ्यांसोबतच इतरही पोलीस अधिकाऱ्यांची बदली देखील करण्यात आली आहे. यसंदर्भात अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्याशिवाय, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर परमबीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे १९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी याआधी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, तसेच महाराष्ट्राच्या महासंचालकपदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.

कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे?

अँटिलियाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि त्यात सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या या प्रकरणाची चौकशी सुरू असताना कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला आणि हे प्रकरण अधिकच वाढलं. या प्रकरणामध्ये नंतर मुंबई पोलीस सीआयूचे अधिकारी सचिन वाझे यांचं देखील नाव समोर आलं. सचिन वाझे यांना या प्रकरणी निलंबित देखील करण्यात आलं आहे. एनआयएकडून सचिन वाझेंची सध्या चौकशी सुरू असून यामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, सचिन वाझे थेट ज्यांना रिपोर्ट करत होते आणि ज्यांच्या जवळचे मानले जातात त्या परबीर सिंग यांच्याकडे देखील आरोपाची बोटं वळायला लागली. या पार्श्वभूमीवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं आता सांगितलं जात आहे.

NIA चा मोठा खुलासा! CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच!

दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली असून त्यामध्ये पोलीस दलावर टीका करणाऱ्यांना त्यांनी सुनावलं आहे.