मुंबई पोलिसांच्या इतिहासात सोमवारी एका नव्या घटनेची नोंद झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी रुजू होण्यासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकांच्या खुद्द पोलीस आयुक्तांनीच मुलाखती घेतल्या. मुंबईत ९३ पोलीस ठाणी असून इतर विविध शाखा (साइड ब्रँचेस) आहेत. बदल्यांचे सत्र सुरू असून मुंबईतल्या २६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची मुंबईबाहेर बदली झाली आहे, तर ३५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना साहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळाली आहे. त्यामुळे अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त आहेत. मुंबईत विविध पोलीस ठाण्यांत ७५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची आवश्यकता आहे. १९८७-८८ च्या बॅचच्या पोलिसांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची बढती मिळाली असून त्यांची या जागेत वर्णी लागणार आहे. मात्र त्यांना या पदावर नियुक्ती करण्यापूर्वी आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांची मुलाखत घेण्याचे ठरवले होते. मुलाखती घेऊन त्यांच्या योग्यतेप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे पोलीस ठाणे देण्यात येणार आहे. त्यानुसार शनिवारी पोलीस मुख्यालयात या मुलाखती झाल्या. एकूण ९० पोलीस निरीक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आयुक्त राकेश मारिया, सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती आणि सहपोलीस आयुक्त (प्रशासन) या वेळी उपस्थित होते. अवघ्या २ ते ३ मिनिटांत या मुलाखती औपचारिक प्रश्न विचारून आटोपण्यात आल्या. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात आला. राकेश मारिया यांना केवळ आपल्या अनुभवी नजरेतून हे अधिकारी हेरायचे होते. त्यामुळे त्यांना समोर बोलावून त्यांची चाचपणी करण्यात आली.
मंगळवारी बैठक
मुंबईतून बदली झाल्याने नाराज पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. त्यापैकी अनेक जण आपापले वजन वापरत होते. दरम्यान, या संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची सहय़द्री अतिथिगृहात बैठक होणार आहे.

प्रत्येक पोलिसाचा रेकॉर्ड असतो. तरीसुद्धा ते कोण आहेत, त्यांचे विचार काय, त्यांची क्षमता काय हे पारखण्यासाठी या मुलाखती घेतल्या. त्यांच्या क्षमतेनुसार संबंधित पोलीस ठाण्याचे  पद देण्यात येणार आहे.
देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था)

मुलाखतीस खुद्द आयुक्त, सहपोलीस आयुक्त समोर असल्याने काय होईल याची भीती होती; पण आयुक्तांनी अगदी मोकळ्या वातावरणात हलकेफुलके प्रश्न विचारले.
– मुलाखत झालेला एक पोलीस अधिकारी.