मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये महिला कारवाई केल्याचा रागातून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत होतं. यावेळी तिथे उपस्थित इतर लोकही हे सर्व पाहत उभे होते. महिला मारहाण करत असताना पोलीस कर्मचारी मात्र संयम बाळगून होता. समोर महिला असल्याने त्यांनी तिला कोणत्याही प्रकारे रोखण्याचा प्रयत्न केला नाही किंवा अडवणूक केली नाही. पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या या संयमाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला आहे.
एकनाथ श्रीरंग पारठे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

एकनाथ पारठे मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहेत. एकनाथ पारठे यांनी केल्लाय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला असून १० हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.  यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला.

याशिवाय ज्या ठिकाणी एकनाथ पारठे यांना माराहण झाली होती त्या ठिकाणीही त्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई पोलिसांनी सत्काराचा व्हिडीओ ट्विटरला पोस्ट केला आहे.


काय आहे नेमकं प्रकरण –
मुंबईतील काळबादेवी परिसरात असलेल्या कॉटन एक्स्चेंज नाका येथे आपले कर्तव्य बजावत असताना एकनाथ पारठे यांना महिलेने कॉलर पकडून मारहाण केली होती.

वाहतूकीचे नियम मोडल्याने एकनाथ पारठे यांनी संबंधित महिलेवर कारवाई केली होती. एकनाथ पारठे यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने तिने मारहाण केली असा महिलेचा दावा होता. या प्रकरणी आरोपी महिला आणि तिच्यासोबत आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे.