पोलिसांच्या मदतवाहिनीवर ८० टक्के दूरध्वनी विनाकारण

एक शून्य शून्य.. एखादी दुर्घटना वा गुन्हा घडल्यास मुंबई पोलिसांशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी कित्येक वर्षांपासून कार्यरत असलेली हेल्पलाइन अलीकडच्या काळात पोलिसांचीच डोकेदुखी बनली आहे. दररोज सरासरी एक लाख दूरध्वनी येणाऱ्या या ‘१००’ नंबरवर तब्बल ८० टक्के फोन हे विनाकारण वा चुकीच्या समजुतीने लावण्यात आलेले असतात. पोलिसांच्या या तक्रार निवारण कक्षामध्ये ४८ कर्मचारी नागरिकांचे दूरध्वनी घेण्यासाठी तत्पर असले तरी, विनाकारण येणाऱ्या दूरध्वनींचा निपटारा करण्यातच या कर्मचाऱ्यांचा बहुतांशी वेळ खर्च होत आहे.

पोलीसांच्या १०० नंबर या हेल्पलाइनवर फोन केल्यानंतर हा फोन पोलीस तक्रार निवारण कक्षात जातो. आलेल्या फोनच्या कॉलर आयडीवरून जागा समजल्यानंतर जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून तेथील जवळपासच्या पोलीस गाडीला तक्रारीबाबत कळविले जाते. या हेल्पलाइनवर येणाऱ्या फोनची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता सुमारे लाखांच्या आसपास पोहोचली आहे. यातील जवळपास १५०० फोनवरूनच प्रत्यक्ष पोलिसांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित तक्रारी येत असून त्यानुसार कारवाई करण्यात येते.

या हेल्पलाइनवर येणाऱ्या फोनपैकी बरेचसे फोन हे मिस्ड कॉल, ब्लँक कॉल किंवा चुकून लागलेले कॉल असतात. यातील बहुतांश फोन हे सकाळी ६ ते ८ या वेळेत येत असतात. तक्रार निवारण कक्षात दिवसभरात सुमारे ३०० व्यक्ती या अशा विषयांवर तक्रार करण्यासाठी फोन करतात ज्यासाठी त्यांनी खरेतर न्यायालयात जाणे अपेक्षित आहे. तसेच बरेच फोन हे दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींकडून येत असतात. अशा व्यक्तींना ताकीद देऊन फोन बंद केला जातो. परंतु पुन:पुन्हा फोन आल्यानंतर मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो. गंमत म्हणून बऱ्याचदा लहान मुलांचे ही या हेल्पलाइनवर फोन येत असतात, असे कक्षातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. या हेल्पलाइनवर काही व्यक्ती नियमितपणे फोन करून अर्धा तास त्यांच्या अडचणी सांगत असतात. ३ मिनिटांमध्ये तक्रारदाराची अडचण सोडवून फोन बंद करण्याची सूचना आम्हाला देण्यात आली आहे. परंतु अशा फोनमुळे फोन बराच काळ व्यस्त राहतो आणि आमचा वेळही जातो, असेही पुढे ते सांगतात.