मुंबईकरांचे पाणी टँकरमध्ये भरून विक्री

पदपथावर झोपडय़ा उभारून आतमध्ये खड्डा खोदून पालिकेच्या जलवाहिनीतून पाणी चोरून, दाणाबंदर परिसरातील व्यावसायिक आणि झोपडपट्टीवासीयांकडून दामदुपटीने पैसे घेऊन त्यांची तहान भागविणाऱ्या माफियांचे सूरत स्ट्रीट आणि संत तुकाराम मार्गावरील साम्राज्य पालिका अधिकाऱ्यांनी मंगळवारी उधळून लावले. दाणाबंदरची तहान पाणी माफियांकडून भागविली जात असल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेने झोपडपट्टीत कार्यरत असलेले झोपडपट्टी दादा आणि पाणी माफिया यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दाणाबंदर परिसर निरनिराळ्या बाजारपेठांनी व्यापला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बाजारपेठांच्या आसपासचे रस्ते आणि मोकळ्या जागांवर मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. अशीच एक झोपडपट्टी दाणाबंदर परिसरातील सूरत स्ट्रीट आणि संत तुकाराम मार्गाच्या संगमावरील पदपथावर उभी राहिली. पदपथ मोकळा करण्यासाठी पालिकेने ही झोपडपट्टी हटविण्याचा निर्णय घेतला आणि या झोपडपट्टीमध्ये सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाअंती पात्र झोपडपट्टीवासीयांना माहूल येथील प्रकल्पग्रस्तांची घरे पालिकेने दिली. परंतु माहूल येथील घरे राहण्यायोग्य नसल्याचा दावा करीत येथील पात्र झोपडपट्टीवासीयांनी तेथे जाण्यास सपशेल नकार देत येथेच ठाण मांडले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सूरत स्ट्रीटवर मोठ्ठी पक्की पाण्याची टाकी पालिका अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडली होती. पालिका अधिकाऱ्यांनी या भागावर लक्ष केंद्रित केले आणि या झोपडपट्टीमधील झोपडय़ांमधून पाणीविक्रीचा मोठय़ा प्रमाणावर व्यवसाय सुरू असल्याचे उजेडात आले. दोन दिवसांपूर्वी निरनिराळ्या झोपडय़ांमध्ये छापा मारून पालिका अधिकाऱ्यांनी पाण्याचा उपसा करणारे १३ पंप जप्त केले. पालिकेचा जल विभाग आणि परिरक्षण विभागाने मंगळवारी या परिसरात संयुक्त कारवाई करीत झोपडय़ांमधून आणखी सहा पंप जप्त केले. तसेच तेथील भलीमोठ्ठी पक्की पाण्याची अनधिकृत टाकीही तोडून टाकली.

या परिसरातील पदपथाखालून पालिकेच्या जलवाहिन्या गेल्या आहेत. हे हेरून त्याच पदपथावर झोपडय़ा उभारण्यात आल्या. झोपडीमधील पदपथावर खोदकाम करून जलवाहिनीला छिद्र पाडून त्यावर पंप बसविण्यात आले होते. या पंपाच्या साह्य़ाने जलवाहिनीतील पाणी टँकरमध्ये भरण्याचा अनधिकृत व्यवसाय येथे सुरू होता. तसेच जवळच उभारलेल्या मोठय़ा टाकीत पाण्याचा साठा करून त्याची विक्री करण्यात येत होती. साधारण ३०० ते ४०० रुपयांना छोटा टँकरभर पाण्याची विक्री येथून केली जात होती. जलवाहिन्यांना पाडलेली छिद्रे पालिकेच्या जलविभागाने तात्पुरती बंद केली आहेत. मात्र या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी पदपथावर खड्डा पाडावा लागणार आहे. त्यासाठी रस्ते विभागाकडून जलविभागाला परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच या जलवाहिन्यांची दुरुस्ती करता येईल, असे पालिका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

‘पेइंग गेस्ट’चा धंदा तेजीत

येथील काही झोपडय़ांवर आणि झोपडय़ांच्या पुढे अतिरिक्त बांधकाम करण्यात आले आहे. अतिरिक्त बांधकाम करण्यात आलेल्या जागा दामदुप्पट भाडय़ाने देण्यात आल्या आहेत. बाजार परिसर आणि दारूखाना येथे काम करणारे परराज्यातील अनेक तरुण या अतिरिक्त जागांमध्ये वास्तव्यास आहेत. काही झोपडय़ांमध्ये ‘पेइंग गेस्ट’ तत्त्वावर हे तरुण वास्तव्यास आहेत.

या झोपडपट्टीतील पात्र झोपडपट्टीवासीयांना माहूल येथे घरे देण्यात आली आहेत, पण ती घरे राहण्यायोग्य नसल्याचे कारण पुढे करीत त्यांनी येथेच ठाण मांडले आहे. या झोपडपट्टीमध्ये सर्रास पाणीचोरी केली जात आहे. पालिकेने कारवाई केल्यानंतर नवा पंप बसवून पुन्हा जलवाहिनीतून पाणी चोरले जात आहे. झोपडय़ा भाडय़ाने देणे आणि पाणी विकणे हा येथील काही मंडळींचा व्यवसाय बनला आहे. त्यामुळे ते येथून जाण्यास तयार नाहीत. पालिकेच्या पाण्याची चोरी करून ते विकणाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल.

– उदयकुमार शिरुरकर, साहाय्यक आयुक्त, ‘बी’ विभाग कार्यालय