दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर ‘आईस’ हे सॉफ्टवेअर आणल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी अत्याधुनिक असे ‘आय वॉच’ हे नवे अ‍ॅप्लीकेशन कार्यान्वित करण्याचे ठरविले आहे. हे नवे अप्लीकेशन ‘आईस’पेक्षा अधिक फायदेशीर असून त्यामुळे मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात थेट घटनास्थळाचा व्हिडिओ पाठविणे शक्य होणार आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी सांगितले.
‘आईस’मुळे पीडित महिलेला एक कळ दाबताच पोलिसांसह तिच्या जवळच्या नातेवाईकांना ती संकटात असल्याचा संदेश पाठविता येत होता. हे सॉफ्टवेअर अनेकांनी डाऊनलोड केले. मात्र ते कार्यान्वित होण्यात अडचणी येत होत्या. शिवाय या माध्यमातून केवळ लघुसंदेश जात होता. त्यापेक्षा अत्याधुनिक अ‍ॅप्लीकेशन असावे, असा आपला प्रयत्न होता. ‘आय वॉच’ हा त्याचा सुधारित अवतार आहे. या अ‍ॅप्लीकेशनमुळे पीडित महिलेला घटनास्थळाचा वा आरोपीचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. हा व्हिडिओ अ‍ॅप्लीकेशनवरील कळ दाबताच नियंत्रण कक्षात पोहोचणार आहे. अशा प्रकारच्या तक्रारींवर खास लक्ष ठेवण्यासाठी विशेष कक्ष स्थापण्यात येणार आहे, असेही डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.
‘आईस’चा वापर आजही काही पीडित महिला करतात. काही वेळा ‘आईस’ नीट कार्यरत नसल्याच्याही अनेक तक्रारी आल्या. आजकाल मुंबईतील जवळपास सर्वच नोकरदार महिलांकडे अँड्राईड फोन आहे. या फोनवर हे अ‍ॅप्लीकेशन सहजगत्या डाऊनलोड होऊ शकते. केवळ एक कळ दाबताच कॅमेरा सुरू होऊन चित्रीकरणही करू लागते. हे चित्रीकरण कळ दाबताच थेट नियंत्रण कक्षात पोहोचल्यानंतर विशेष कक्षातील कर्मचारी आवश्यक ती मदत संबंधित महिलेसाठी तातडीने पाठवू शकतील, अशी यंत्रणा असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. ‘आईस’ नीट चालत नाही वा आता या नव्या अ‍ॅप्लीकेशनमुळेही अडचणी येतील, अशी ओरड करण्यापेक्षा त्याचे स्वागत करा आणि वापर सुरू करा. अडचणी दूर केल्या जातील, असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.

काय आहे अ‍ॅप्लीकेशन?
* ‘स्मार्ट फोन’वरच हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.
* विशिष्ट कळ दाबताच कॅमेरा सुरू होईल़
* चित्रीकरण सुरू होताच ते नियंत्रण कक्षातही पोहोचेल.
* जीपीएस पद्धतीमुळे नेमके ठिकाणही कळू शकेल.

महिलांविरुद्धच्या तक्रारी घटल्या
सर्व पोलीस ठाण्यांना महिलांविरुद्धच्या कोणत्याही तक्रारी नोंदविण्याचे आदेश आहेत. गेल्या वर्षभरात महिलांच्या तक्रारीत कमालीची वाढ झाली. मात्र यंदा जानेवारी महिन्यात महिलांच्या तक्रारीत घट झाल्याचा दावा डॉ. सिंग यांनी केला़