आर्थिक वादाचा संशय, टीव्ही अभिनेत्रीचीही कसून चौकशी

घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी (५७) यांची हत्या केल्याप्रकरणी सचिन पवार आणि दिनेश पवार या दोन तरुणांना पंतनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. सचिन हा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक, तर दिनेश हा मुंबई पोलीस दलातील निलंबित शिपाईआहे. आर्थिक वाद आणि प्रेयसीला उद्देशून केलेली टिप्पणी या हत्येच्या मुळाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या दोघांव्यतिरिक्त हत्येत सहभाग घेतलेल्या आणखी तीन आरोपींचा  शोध सुरू आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी हिंदी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचारजीकडे दिवसभर कसून चौकशी केली.

‘तुझी मैत्रीण टीव्ही मालिकांमध्ये काम करते. या अभिनेत्री कुठेही तडजोडी करतात. तू काळजी घे’, ही उदानी यांची टिप्पणी सचिनला खटकली. त्याशिवाय उदानी सचिनच्या मैत्रीणीला सातत्याने लघुसंदेश धाडून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत, असा संशय सचिनला होता. त्यामुळे त्याने मित्र दिनेशच्या मदतीने उदानी यांचा काटा काढण्याचा कट आखल्याचा पोलिसांचा आरोप आहे. २८ नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास राजेश्वर घाटकोपर येथील कार्यालयातून निघाले. विक्रोळी, पूर्वद्रुतगती मार्गावर त्यांनी चालकाला आपली कार रस्त्याकडेला उभी करण्यास सांगितले. इथून पुढे मी कार नेईन, तू घरी निघून जा, अशी सूचना चालकाला केली. मात्र पुढल्या काही मिनिटांत शेजारी येऊन थांबलेल्या अन्य एका कारमध्ये बसून राजेश्वर पुढे निघून गेले. ती कार आरोपींची होती. आरोपींनी उदानी यांना गळा आवळून ठार मारले. त्यानंतर त्यांना पनवेल जवळील नेरे गावात उंचावरून खाली फेकले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

राजेश्वर घरी न परतल्याने उदानी कुटुंबाने पंतनगर पोलीस ठाणे गाठून हरविल्याची तक्रार दिली. त्यावेळी मुख्य आरोपी सचिनही कुटंबासोबत पोलीस ठाण्यात आला होता. मात्र पोलिसांनी उदानी यांच्या मोबाईलवर आल्या गेल्या कॉलचा तपास सुरू केल्याचे कळताच सचिनने मुंबई सोडून गुवाहाटी गाठले. अपहरण होण्यापुर्वी उदानी यांच्या मोबाईलवर सचिनचे १३ कॉल पोलिसांना आढळले. त्याचा शोध सुरू असताना उदानी यांच्या संपर्कात असलेल्या काही तरूणींना चौकशीसाठी बोलावले. गुरूवारी पनवेल पोलिसांना नेरे गावात उदानी यांचा मृतदेह आढळला होता.